वाहतूक विषयक एक महिना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:06+5:302021-01-19T04:14:06+5:30

अभियानाचे उद्घाटन पुणे : पुण्यात आलो तेव्हा अनेकांनी येथील वाहतूकीबद्दल अनेक जण बोलत होते. येथील वाहतूकीचे प्रश्न सोडवून पुणेकरांना ...

One month public awareness on transport | वाहतूक विषयक एक महिना जनजागृती

वाहतूक विषयक एक महिना जनजागृती

Next

अभियानाचे उद्घाटन

पुणे : पुण्यात आलो तेव्हा अनेकांनी येथील वाहतूकीबद्दल अनेक जण बोलत होते. येथील वाहतूकीचे प्रश्न सोडवून पुणेकरांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रस्ता सुरक्षा अभियानात विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. पुढील एक महिना वाहतूक विषयक जनजागृतीवर भर देणार आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियानाचे उपक्रमाचे अलका टॉकिजजवळील टिळक चौकात एका कार्यक्रमात गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त प्रियंका नारनवर, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजीव भोर, पराग गुजराथी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणारे वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, पीएमपी चालक, रिक्षाचालक यांचा प्रातिनिधिक सत्कार केला. वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नारायणदास फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अमिताभ गुप्ता म्हणाले की, पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे. वाहतूक सुधारणा ही केवळ वाहतूक पोलिसांवर अवलंबून नाही. पोलीसाकडून त्यांची अंमलबजावणी केली जाते. पण नियम पाळणे प्रत्येकावर अवलंबून आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचा एक भाग म्हणून पुढील एक महिना जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.

कोरोनापेक्षा रस्ता अपघातात अधिक मृत्यू

वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, कोरोनामध्ये देशभरात आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्याची आपण सर्वांनीच गंभीरपणे दखल घेतली आहे. पण, त्यापेक्षा अधिक लोकांना रस्ता अपघातात प्राण गमवावे लागतात. २०१६ - १७ मध्ये एका वर्षात जवळपास दीड लाख लोकांना रस्ता अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. त्यापेक्षा कितीतरी अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी पुण्यात ७८१ अपघात झाले असून त्यात १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आम्ही उद्दिष्ट ठेवले असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

फोटो : रस्ता सुरक्षा अभियनाचे उदघाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्या वाहतूक पोलिसांचा गौरव करण्यात आला . यावेळी पराग गुजराथी, संजीव भोर, राहुल श्रीरामे, डॉ. संजय शिंदे, डॉ. प्रियंका नारनवरे.

Web Title: One month public awareness on transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.