पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार; मुंढव्यातील महिलेच्या मुलालाही लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:38 AM2024-06-29T10:38:37+5:302024-06-29T10:39:12+5:30
याआधी एरंडवणे येथे एक डाॅक्टर आणि त्याची १५ वर्षांची मुलगी असे दाेन रुग्ण ‘झिका’साठी पाॅझिटिव्ह आले हाेते....
पुणे : पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णांची संख्या चार झाली आहे. मुंढवा येथे एका ४७ वर्षांच्या महिलेला झिका झाला हाेता. तिचा अहवाल १ जून राेजी खासगी प्रयाेगशाळेत पाॅझिटिव्ह आला हाेता. आता तिच्याच मुलाचा अहवाल शुक्रवारी पाॅझिटिव्ह आला आहे. त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आराेग्य प्रमुख डाॅ. कल्पना बळीवंत यांनी दिली.
याआधी एरंडवणे येथे एक डाॅक्टर आणि त्याची १५ वर्षांची मुलगी असे दाेन रुग्ण ‘झिका’साठी पाॅझिटिव्ह आले हाेते. त्यानंतर मुंढवा येथे महिला पाॅझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आराेग्य विभागाला मिळाली. आता त्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले असता तिच्या मुलालादेखील लागण झाल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, ‘झिका’मुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्वसामान्य नागरिक आणि खास करून गर्भवती महिलांनी डासांपासून काळजी घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.