एकाच्या तोंडाला तर एकाच्या गळाल्या कापले; बारामतीत चिनी मांजाने दोघांना केले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 05:14 PM2024-08-09T17:14:51+5:302024-08-09T17:15:22+5:30
केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे
बारामती : बारामती शहर व परिसरात छुप्या पद्धतीने विकला गेलेला चिनी मांजा नागपंचमी दिवशी दोघांना गंभीर जखमी करून गेला. शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत वंजारवाडी (ता. बारामती) येथील माजी सैनिक अनिल मोहन कायगुडे (वय ४0) ०९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्तंभ येथे जात असताना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास येथील मएसो विद्यालयासमोर चिनी मांजाने त्यांचा गळा कापला गेला. यात ते गंभीर जखमी झाले.नागरिकांनी त्यांना खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या गळ्याला मोठी जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. अचानक झालेल्या या घटनेमुळे ते दुचाकीवरून खाली कोसळले. कायगुडे हे बांधकाम व्यावसायिकही आहेत.या घटनेत मेजर अनिल कायगुडे यांचा जीव थोडक्यात बचावला. अन्यथा नागपंचमी दिवशीच त्यांच्या जीवावर बेतू शकले असते. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.
दुसरी घटना येथील तीन हत्ती चौकानजीक कालवा रस्त्यावर घडली. त्यात आदित्य उंडे नावाचा युवक गंभीर रित्या जखमी झाला. आदित्यला झालेली जखम ही तोंडापासून ते कानापर्यंत अशी आहे. त्याच्यावरही शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बारामतीतील विविध संघटनांनी चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा, अशी आग्रही मागणी नगरपरिषद व पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीनावर कारवाई करत त्याच्याकडून १२ हजारांचा चिनी मांजा जप्त केला. पण ही कारवाई पुरेशी नव्हती. छोट्या टपऱ्या व अन्य दुकानांची झडती घेत कारवाई झाली असती तर कदाचित या दोघांवर गंभीर जखमी व्हायची वेळ आली नसती, असे नागरिक सांगत आहेत.