दगडाने डोके ठेचून एकाची हत्या
By Admin | Published: May 12, 2017 04:56 AM2017-05-12T04:56:43+5:302017-05-12T04:56:43+5:30
येथे राहात असलेल्या वारकरी संप्रदायातील बालाजी इभूते (वय ४०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने तोंड व डोके ठेचून हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : येथे राहात असलेल्या वारकरी संप्रदायातील बालाजी इभूते (वय ४०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने तोंड व डोके ठेचून हत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली.
इभूते हे मूळचे कर्नाटक येथील रहिवासी असून, ते अनेक वर्षांपासून शिक्रापूर येथे राहात आहेत. सणसवाडी येथील एका खासगी कंपनीत ते नोकरी करत आहेत. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास चौकातून जाऊन येतो असे पत्नीला सांगून ते बाहेर गेले परंतु ते घरी आले नाहीत. त्यानंतर पत्नीने त्यांना मोबाईलवर फोन केला असता दहा मिनटांत येतो असे सांगितले. परंतु बालाजी इभूते आलेच नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने रात्री अडीचच्या सुमारास राजू अंकुशे व शेजारील आशिष यांना इभूते यांना पाहण्यासाठी चौकात पाठविले. यांनतर हे दोघे चौकात जात असताना घरापासून काही अंतरावर असलेल्या एसटी स्थानकाशेजारील रस्त्यावर बालाजी जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. या वेळी येथून पन्नास फूट अंतरावर त्यांची दुचाकी पडलेली दिसून आली. यानंतर तातडीने शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले. या वेळी बालाजी इभूते यांच्या डोक्याला, कानाला गंभीर मार लागला होता. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. यांनतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे घेऊन जात असताना रस्त्यात बालाजी यांचा मृत्यू झाला.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले आदी घटनास्थळी आले.