वर्षा विहारासाठी आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू; एक जण वाहून गेला, दोघे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 10:15 PM2023-08-24T22:15:53+5:302023-08-24T23:11:41+5:30
सकाळी १०.३० पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले.
तळेगाव दाभाडे- वर्षा विहारासाठी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या चार महाविद्यालयीन युवकांपैकी दोघेजण वाहून गेले. तर दोघेजण बचावले. एका युवकाचा मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासन ,वन्यजीव रक्षक मावळ,शिवदुर्गमित्र लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
अनिकेत वर्मा (वय १७) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अशोक गुलाब चव्हाण (वय१७, रा. चिंचवड) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवार(दि.२४) रोजी सकाळी चिंचवड येथील श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेज मधील ८ते ९मित्र वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी कुंडमळा येथे आले होते. हे सर्व जण कॉलेजला दांडी मारून लोकलने बेगडेवाडी येथे उतरले. त्यानंतर त्यांनी सर्वांनी पायी कुंडमळा गाठला.त्यातील चौघे पाण्यात उतरले. त्यातील दोघे जण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेले.
सकाळी १०.३० पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले. अशोक गुलाब चव्हाण (वय१७, रा. चिंचवड) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व त्यांचे सहकारी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, शिवदुर्ग मित्रचे सचिन सुनील गायकवाड,भास्कर माळीमामा,गणेश ढोरे, गणेश निसाळ, विनय सावंत, गणेश गायकवाड, विकी दौडकर, अविनाश कार्ले, शुभम काकडे, निनाद काकडे, वैभव वाघ, सागर कुंभार , रतन सिंग, योगेश दळवी , सिध्देश निसाळ महेश मसणे, राजेंद्र कडू, प्रशांत शेडे, सागर भेगडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषचे निरंजन भेगडे, रियाज मुलाणी, गणेश जावळेकर , शुभम काळोखे , धीरज शिंदे, अक्षय घोडेकर यांनी अथक प्रयत्न केले.
अंधार पडल्याने रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली. शुक्रवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता पुन्हा ही शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व नीलेश गराडे यांनी सांगितले. (कोट) कुंडमळा येथील रांजणखेळगे पाहताना पाण्यात उतरू नये. पाण्याचा प्रवाह प्रचंड असून अनेक ठिकाणी निसरडे झाले आहे. त्यामुळे पाय घसरून अपघात होऊ शकतो. आपला जीव महत्त्वाचा आहे. वर्षा विहाराचा आनंद लुटताना नियमांचे पालन करावे. - निलेश गराडे संस्थापक: वन्यजीव रक्षक मावळ