एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला
By admin | Published: October 7, 2016 03:15 AM2016-10-07T03:15:25+5:302016-10-07T03:15:25+5:30
एकतर्फी प्रेमामधून माथेफिरू तरुणाने आठ ते दहा साथीदारांसह २० वर्षीय तरुणीवर हल्ला करीत मारहाण केल्याची घटना सिम्बायोसिस महाविद्यालयासमोर
पुणे : एकतर्फी प्रेमामधून माथेफिरू तरुणाने आठ ते दहा साथीदारांसह २० वर्षीय तरुणीवर हल्ला करीत मारहाण केल्याची घटना सिम्बायोसिस महाविद्यालयासमोर घडला. मैत्रिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या दोन मैत्रिणींनाही या टोळक्याने मारहाण केली. संबंधित तरुणीला अक्षरश: रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर कुमार अलकुंटे (रा. हडपसर) याच्यासह त्याच्या आठ ते दहा साथीदारांवर विनयभंग, तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणी सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. आरोपी सागरशी तिची ओळख एका मित्राच्या माध्यमातूनच झाली होती. आरोपीने तेव्हा पीडित मुलीला तोही सिम्बायोसिसमध्येच शिकत असल्याचे सांगितले होते. परंतु, तो सिम्बायोसिसचा विद्यार्थी नसल्याचे तिला समजले. दरम्यान, सागरने तिच्याकडे लग्नाची मागणी घालत प्रेम असल्याचे सांगितले होते.
गोंधळ पाहून महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक घटनास्थळी धावल्यावर हे टोळके तेथून पसार झाले. पोलिसांना प्रकाराची माहिती कळवण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
टोळक्याचे कृत्य : मैत्रिणीलाही मारहाण
४पीडित मुलीने त्याला नकार देत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिच्या नकारामुळे सागरच्या मनात राग धुमसत होता. त्यानंतरही त्याने तिला फोन व मेसेज करणे सुरूच ठेवले होते. सतत तिचा पाठलाग करीत असलेल्या सागरशी ती बोलायचे टाळत होती. त्याचा फोनला व मेसेजला उत्तरे मिळत नसल्यामुळे त्याने तिला एकटी गाठण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी परीक्षा असल्याने पीडित मुलगी महाविद्यालयामध्ये आली होती.
४पेपर दिल्यानंतर घरी जाण्यासाठी दोन मैत्रिणींसह ती महाविद्यालयाबाहेर आली. त्या वेळी सागर त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह तेथे आला. सर्वांनी मिळून तिला मारहाण करायला सुरुवात केली. सागरने तिच्या हाताला धरून ओढायला सुरुवात केली. दरम्यान, तिच्या मैत्रिणी मध्ये आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.