मजनूच्या गळ्यात वरमाळा नाहीतर पोलिसांच्या बेड्या पडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:24 PM2020-11-04T17:24:18+5:302020-11-04T17:24:37+5:30
ही तरुणी क्लासला जाऊ लागली की गेल्या एक वर्षापासून तो तिचा पाठलाग करत असे. तिला आपण लग्न करु असे म्हणत.
पुणे : प्रेमात सारं काही माफ असते असे म्हटले जाते. पण एकतर्फी प्रेमातून केल्या जाणाऱ्या गोरख धंद्यांना कदापि माफी नसते. अशाच प्रकारे एक मजनू एकतर्फी प्रेमातुन तरुणीला लग्नाची मागणी घालत होता. त्याला नकार मिळाल्यानंतरही तो तिच्या घरासमोर मोठमोठ्याने गाणी म्हणत अश्लिल इशारे करीत राहिला. शेवटी गळ्यात वरमाळा पडण्याऐवजी पोलिसांनी बेड्या घातल्या.
शोहेब समीर तांबोळी (वय २१, रा़ महात्मा फुले पेठ) असे या मजनूचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी क्लासला जाऊ लागली की गेल्या एक वर्षापासून तिचा पाठलाग करीत असे. तिला आपण लग्न करु असे म्हणत. त्याने तु लग्न केले नाही तर घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्याची धमकी या तरुणीने धुडकावून लावली. तरीही शोहेब तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. ही तरुणी घरात असताना मंगळवारी तो तिच्या घरासमोर थांबला व मोठ्या मोठ्याने गाणी म्हणू लागला. तसेच अश्लिल इशारे करु लागला. या प्रकारामुळे घरातील लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. खडक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केले. पोलीस उपनिरीक्षक आजगेकर अधिक तपास करीत आहेत.