मुंबई- बंगळुरू महामार्गावर ट्रक व अँब्युलन्सच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 06:47 PM2018-10-19T18:47:56+5:302018-10-19T18:49:10+5:30
ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली.
पुणे : ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली. आनंद प्रकाश व्यास (वय ३४, रा. भोपळे चौक, वारजे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात रघुनाथ गोरख भोंडवे (वय ३८, रा. वारजे ) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक आणि अँब्युलन्सच्या चालकावर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी भोंडवे आणि व्यास हे दुचाकीवरून मुंबई- बंगळुरू महामार्गाने जात होते. ते न-हे येथील संदेश हॉटेलसमोर आले असता त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते दोघे दुचाकीवरून खाली पडले. या अपघातानंतर ते उठून रस्त्यांच्या कडेला जात असतानाच त्यांना पुन्हा एका अँब्युलन्सने धडक दिली. या अपघातात व्यास यांचा मृत्यू झाला तर भोंडवे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर अँब्युलन्सचा चालक गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. पोलीस ट्रक आणि अँब्युलन्स चालकाचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.