Organ Donation: एका व्यक्तीच्या अवयवदानाने मिळते चाळीस जणांना जीवदान...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 03:48 PM2022-05-23T15:48:09+5:302022-05-23T15:48:34+5:30
आयुष्यातल सर्वात श्रेष्ठ कर्म म्हणजे "अवयवदान"
- आरुषी अनारे
रसिकहो, तुम्ही हे ऐकलेच असेल "मरावे परी किरतीरूपी उरावे". याचाच अर्थ कि, आपण किती आयुष्य जगलो हे महत्त्वाचे नाही, पण आपण जितके आयुष्य जगलो. त्यामध्ये असेकाही चांगले कार्य केले पाहिजे की लोक आपल्याला आपल्या मृत्यू नंतर पण स्मरण करतील आणि आपली प्रशंसा करतील. जगातील कुठलीही व्यक्ती पैशाने किंवा ऐश्वर्याने श्रेष्ठ होत नसून तो आपल्या कर्तृत्वाने आणि कर्माने श्रेष्ठ होत असतो, आणि आयुष्यातल सर्वात श्रेष्ठ कर्म म्हणजे "अवयवदान".
खुप लोकांना असे वाटत असेल की, अवयवदान हे मृत्युनंतरच केले जाते. पण अवयवदान हे जिवंत असताना ही केले जाऊ शकते. कायद्यानुसार जीवंत व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीला अवयवदान करू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती अवयवदान करते. तेव्हा त्या दाता व्यक्तीच्या जीवाला धोका नसतो. पण तरीही त्या व्यक्तीतील एक अवयव कमी होतो आणि हे त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. यासाठी जिवंत व्यक्तीने अवयवदान करण्याची संख्या कमी करणे गरजेचे आहे़. यासाठी मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
लक्षात ठेवा एक मृतदेह सात लोकांचा जीव वाचवू शकतो. त्यांना जगण्याची नवीन आशा देऊ शकतो आणि पस्तीस लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो, याचाच अर्थ एकामृतदेहामुळे सुमारे बेचाळीस लोकांना आपले आयुष्य सामान्य माणसासारखे जगता येईल.
तुम्हालापण असे प्रश्न पडले असतील आणि बरेच गैरसमजसुद्धा असतील जसे कोण कोण अवयवदान करू शकत. मृत्यू नंतर किती वेळात अवयवदान करावे? इत्यादी... तर अनैसर्गिक मृत्यू जसे आत्महत्या, अपघात, अपराध, जळून किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास तसेच एड्स किंवा पसरणाऱ्या आजाराने मृत्यू झालेल्या माणसांचे मृतदेह स्विकारले जात नाही.
प्रत्येक अवयवाचे दान मृत्यूनंतर काही ठराविक वेळातच करता येऊ शकते. जसे चार तासापर्यंत हृदय जतन करता येते, सहा तासापर्यंत फुफ्फुसे जतन करता येतात. किडनी अठ्ठेचाळीस तासापर्यंत देता येते आणि डोळ्यांचे जतन मृत्यू झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत करता येते. परंतु अठरा वर्षावरील कोणतीही व्यक्ती स्वईच्छेने अवयवदान करू शकते, तर अठरा वर्षाखालील मुलांना अवयवदान करण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी लागते. म्हणूनच अवयवदान करणे महत्त्वाचे आहे कारण "अवयवदान'' हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. (या लेखाचे लेखक अवयवदान अभ्यासक आहेत.)