एका थाळीवर एक थाळी फ्री; ऑफरच्या मोहापायी महिलेने गमावले तब्बल १ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:41 PM2022-12-08T19:41:36+5:302022-12-08T19:41:43+5:30
थाळी माेफत मिळतेय म्हणून उत्साहाच्या भरात महिलेने मेसेजमधील लिंक उघडून क्रेडिट कार्डची माहिती भरून टाकली
पुणे : डेक्कन भागातील एका नामांकित हाॅटेलमध्ये एका थाळीवर एक थाळी फ्री असा मेसेज महिलेस आला. थाळी माेफत मिळतेय म्हणून उत्साहाच्या भरात महिलेने मेसेजमधील लिंक उघडून क्रेडिट कार्डची माहिती भरून टाकली; मात्र एका थाळीच्या माेहापायी अज्ञात व्यक्तीस माहिती देणे त्यांना चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन माध्यमातून बँक खात्यातून १ लाख १ हजार ७२२ रुपयांची रक्कम काढून घेत फसवणूक केली. टिंगरेनगर येथे राहणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींच्या पत्नीच्या माेबाईलवर ऑगस्ट महिन्यात मेसेज आला. त्यावर डेक्कन परिसरातील एका नामांकित हाॅटेलमधील २५० रुपयांच्या एका थाळीवर एक थाळी फ्री अशी ऑफर सुरू असल्याची माहिती दिली हाेती. तसेच त्या मेसेजमध्ये लिंकही देण्यात आली हाेती. थाळी माेफत मिळेल या उद्देशाने फिर्यादींच्या पत्नीने लिंक क्लिक केली आणि त्यावर क्रेडिट कार्डची माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या पत्नीला अज्ञात व्यक्तीचा काॅल आला आणि त्याने पुन्हा एक लिंक पाठवून ती क्लिक करा असे सांगितले. लिंक उघडताच अज्ञात सायबर गुन्हेगाराने फिर्यादींच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख १ हजार ७२२ रुपये ऑनलाईन काढून घेतले. दरम्यान, हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला हाेता. त्याची पडताळणी करून विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.