कल्याणीनगरमध्ये या '' एका '' कारणामुळे काही तास अघोषित पाणीकपात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 06:02 PM2019-07-18T18:02:01+5:302019-07-18T18:19:35+5:30
फिनिक्स मॉल, सोपान नगर या भागात वांरवार ही समस्या उद्भवते. एका वाहनचालकांच्या शेकडो नागरिकांना पाणी मिळत नाही.
कल्याणीनगर : कल्याणीनगर बिशप शाळेसमोरील पाण्याच्या व्हॉल्ववर गाडी लावल्याने व्हॉल्वमॅनला पाणी सोडता आले नाही. त्यामुळे हरिनगर, विंडसर इस्टेट त्रिंबकेश्र्वर सोसायटी आणि आदर्शनगर या भागामध्ये काही तास अघोषित पाणीकपात झाली.पाणी न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
महापालिका पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या माध्यमातून वेगवगेळ्या परिसरामध्ये पाणी पुरवठा करते.
पाणी सोडण्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व बसवले आहे. व्हॉलमॅन पाणी सोडण्याच्या वेळेवर हा व्हॉल्व सोडतो. त्यांनतर त्या परिसरामध्ये पाणी जाते. ठराविक वेळेनंतर व्हॉल्व बंद करतो. हे व्हॉल्व रस्त्याच्या बाजूला आहेत. व्हॉल्वभोवती एक छोटी लोखंडी चौकट बसवण्यात आली आहे. व्हॉल्व रस्त्याला समांतर आहे. यामुळे अनेकदा चारचाकी वाहने या व्हॉल्ववर उभी केली जातात. ज्यामुळे व्हॉलमॅनला पाणी सोडता येत नाही.यामुळे अघोषित पाणी कपात होते. व्हॉलवर गाडी लावणारा लवकर येत नाही. यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. फिनिक्स मॉल, सोपान नगर या भागात वांरवार ही समस्या उद्भवते. एका वाहनचालकांच्या चुकीमुळे शेकडो नागरिकांना पाणी मिळत नाही. अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.
याबाबत पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले की, कल्याणीनगर भागातील हरिनगर, विंडसर इस्टेट, त्रिंबकेश्र्वर सोसायटी आणि आदर्शनगर या भागामध्ये सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत पाणी येते. पण आज पाणी सोडणा-या व्हॉल्ववर एकाने चारचाकी वाहन लावले होते. आम्ही पोलिसांना याबाबत कळवले होते. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईमुळे उभी करण्यात आलेली गाडी नऊ वाजता काढण्यात आली. त्यानंतर व्हॉल्व सोडून बारा वाजेपर्यंत सोडण्यात आले. बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील उपअभिंयता एकनाथ गाडेकर यांनी सांगितले की, व्हॉल्ववर गाडी लागू नये. यासाठी उपाययोजना करण्यात येईल.