कात्रज दूध उत्पादकांना देणार लिटरमागे एक रुपया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:09 PM2019-09-18T12:09:49+5:302019-09-18T12:12:55+5:30
शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी दर फरकासह प्रतिलिटर २५.१६ आणि म्हशीच्या दुधासाठी ३६.७२ रुपये प्रतिलिटर दर देण्यात आला आहे....
पुणे : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने (कात्रज) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरफरकापोटी प्रतिलिटर एक रुपया देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या हातात दिवाळीपुर्वीच अतिरिक्त रक्कम पडणार आहे. या शिवाय संघाचे सभासद असलेल्या दूध संघांना १४ टक्के लाभांशापोटी तब्बल ८१ लाख ५१ हजार रुपये देण्याचा निर्णयही वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी घेण्यात आला.
दूध उत्पादक संघाची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. दूध उत्पादक संघाला राष्ट्रीय स्तरावरील क्वालिटी हे गुणवत्ता व शुद्धतेची हमी असलेले चिन्ह मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. असे चिन्ह मिळालेला पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला संघ ठरला आहे. शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी दर फरकासह प्रतिलिटर २५.१६ आणि म्हशीच्या दुधासाठी ३६.७२ रुपये प्रतिलिटर दर देण्यात आला आहे. वर्षभरातील दरफरकापोटी एक रुपये प्रतिलिटर प्रमाणे शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.
उत्पादक संघाने दूध संकलनासाठी १३५ बल्क मिल्क कुलर बसविले असून, १५० मिल्क पार्लर सुरु केले आहेत. नवी मुंबई, मुंबई, नाशिक, वसई या ठिकाणी संघाने दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण सुरु करण्यात आले आहे. संघाची उलाढाल २९१.९५ कोटी रुपयांची असून, निव्वळ नफा २.४८ कोटी रुपये झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.
अवसरी, व्यंकोजी, श्री महेश्वर, नायफड, स्वामी समर्थ, साईबाबा, शिवामृत, नारायणगाव, मुक्ताई, काळुबाई, स्वामी विवेकानंद, उरावडे आंबेगाव, सावित्रिबाई फुले, नागेश्वर आणि नेरे विभाग या सहकारी दूध उत्पादक संघाना उत्कृष्ट संघाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रत्येकी ११ हजार आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
--------------
उत्पादक संघाचे विस्तारीकरण होणार
कात्रज येथील दुग्धालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ््या दूग्धजन्य पदार्थांसाठी राष्ट्रीय दूग्ध विकास बोर्डाच्या सहकायार्ने ८४ कोटी रुपयांचा अत्याधुनिक व स्वयंचलित उत्पादन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच, कोंढापूरी शीतीकरण केंद्र येथे ३ कोटी रुपयांचा पशूखाद्य कारखाना देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने देण्यात आली.