बारामतीच्या पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:38 PM2019-06-07T15:38:32+5:302019-06-07T15:45:12+5:30
पाण्यावरुन राजकारण करु नये असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
पुणे : पाण्यावरुन राजकारण करु नये, असे राजकारण करणे दुर्देवी आहे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचे काय करायचे असा सवाल करत पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला नीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर शेट्टी बाेलत हाेते. पुण्यात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यातील पत्रकार संघात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या काैतुक साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते.
शेट्टी म्हणाले, पाण्यावरुन राजकारण हाेऊ नये, असं मला वाटतं. असं राजकारण हाेत असेल तर ते अत्यंत दुर्देवी आहे. पाण्यावर शेतकऱ्याचा, सर्वसामान्यांचा अधिकार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप झालं की नाही, हे तपासून बघावे लागले. परंतु ज्याच्या त्याच्या वाट्याचं पाणी त्याला मिळायला हवं. जर ते मिळालं नसेल तर बारामतीच्या पाण्याचा मुद्दा आत्ताच का काढला जाताे ? असा प्रश्न निर्माण हाेताे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचं काय करायचं असा प्रश्न निर्माण हाेताे . बारामतीला देण्यात आलेलं पाणी हे त्यांच्या काेट्यापेक्षा जास्त आहे की नाही याबाबत मला कल्पना नाही, परंतु जास्त असेल तर आत्तापर्यंत सरकारने का डाेळेझाक केली ? आणि नसेल तर अचानक बंद करण्याचे कारण काय ? पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना याची किंमत माेजावी लागेल.
माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी नीरा-देवघर धरणातील पाण्याचे बारामती व इंदापूर या तालुक्यांना होणारे वाटप थांबविण्यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले होते. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाणी बंद करण्याचे आदेश दिले हाेते.