एकीकडे कोरोनामुक्त रुग्ण केल्याचा सर्वोच्च आनंद तर दुसरीकडे ममत्वाला पोरके होत असल्याची खंत....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 08:53 PM2020-04-21T20:53:40+5:302020-04-21T21:37:41+5:30
माझ्या ड्यूटी काळातच ३ कोरोना पेशंट बरे होऊन, डिस्चार्ज घेऊन घरी गेले. त्यावेळेस खूपच अभिमान वाटला की आम्ही करत असलेला त्याग, मेहनत वाया गेली नाही...
विश्वास मोरे -
पिंंपरी : कोरोनाविरोधी लढण्यात महापालिकेतील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उतरले आहेत. जगभरात थैमान घातल्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशातच सर्वस्व पणाला लावून देवदूतांच्या रूपाने डॉक्टर आणि परिचारिका काम करत आहेत. संसार, रुग्णसेवा अशा दुरंगी भूमिका काही परिचारिका सांभाळत आहेत. पहिले तीन रुग्ण कोरोनामुक्तीचा अत्यांनद होत असताना ममत्वापासून दूर गेलेल्या सुवर्णा संतोष नाझरेकर या देवदूताने सांगितलेली कथा अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही.
पिंंपरी-चिंंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नाझरेकर या सेवा देत आहेत.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत ११ मार्चला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून महापालिकेने निर्माण केलेल्या टीममध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांनी संसार, रुग्णसेवा अशी भूमिका सांभाळत असताना त्यांच्या जीवाची होणारी तगमग मुलाखतीतून जाणवते. त्यांनी सांगितलेले अनुभव हे संचारबंदीतही खुलेआम फिरणाऱ्यांच्या डोळ्यात अंजण घालणारे आहेत.
सुवर्णा नाझरेकर म्हणाल्या, कोरोनासाठीच्या वॉर्डात काम करीत असल्याने आम्हाला केवळ रुग्णालयातच नव्हे, तर घरीही सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे कामाहून परतल्यानंतर आपल्या मुलाला आपण जवळ घेऊ शकत नसल्याचा मानसिक त्रास आणि यातना व्हायच्या. घरी आल्यावर कुठेही टच न करता, सर्वप्रथम गरम पाण्याने आंघोळ करून अर्थात रुग्णसेवा संपल्यानंतर घरातील दुसरी भूमिका सुरू होते. म्हणून लगेचच तोंडावर मास्क बांधून स्वयंपाकाला लागते. पहिल्या दिवशी लहान मुलगा जवळ येऊन म्हणाला, मम्मी घरात मास्क का लावलेस? त्यावेळी क्षणभर काहीच सुचले नाही आणि मी जोरात ओरडून म्हणाले, लांब हो माझ्यापासून, हॉलमध्ये जाऊन खेळ. त्यावर त्याने मला विचारले, का मम्मी? आणि त्याचा भेदरलेला चेहरा पाहून मला खूपच त्रास झाला. त्याला काय सांगणार मी... ४ कोरोना पॉझिटिव्ह व ५ संशयित पेशंटची सेवासुश्रूषा करून आले होते. त्याची तगमग मला पाहावत नव्हती.
रुग्णालयात रुग्णसेवा करताना पीपीई किट वापरल्या जात असल्या तरी मनात एक भीती असतेच ना. आपल्याला काही झाल तरी चालेल; पण मुलांना काही होऊ नये. मी स्वयंपाक करून गॅलरीत निघून गेले. मुलांना दुरूनच म्हटलं, आपापल्या हाताने ताट घेऊन जेवण घ्या. मनात असूनही त्यांच्यापासून दूर राहणं गरजेचे होत.
घर आणि रुग्णालय अशी दुरंगी भूमिका करीत असताना माझ्या ड्यूटी काळातच ३ कोरोना पेशंट बरे होऊन, डिस्चार्ज घेऊन घरी गेले. त्यावेळेस खूपच अभिमान वाटला की आम्ही करत असलेला त्याग, मेहनत वाया गेली नाही. खरे तर अजून खूप-खूप लढायचे आहे. आणि कोरोनावर मात करायची आहे. भारताचे अमेरिका, इटली होऊ द्यायचे नसेल तर घरातच रहा. मित्रांनो, आम्ही एकटेच ही लढाई जिंंकू शकत नाही. तुमच्या सोबतीची, पाठबळाची सध्या आम्हाला अत्यंत गरज आहे. काही आठवडे घराचा उंबरठा ओलांडू नका, सरकार आपल्या जिवाचे रक्षण करण्यासाठी सर्व खटाटोप करत आहे, याचे भान ठेवा. कोरोनाविरोधी लढ्यातील सेवकांना बळ द्या.
- सुवर्णा नाझरेकर, परिचारिका, वायसीएम रुग्णालय
कोरोनाशी लढताना ममत्वापासून दूर होत होते, याचं दु:ख मनात वाटत होतं. घरात कुणीही दुसरी स्त्री नसल्याने मुलांचे खाण्या-पिण्याचे हाल झाले असते. म्हणून नाइलाजाने ड्युटीहून घरीच यावं लागत होते. पहिले ३ दिवस तर झोप लागलीच नाही. डोळ्यासमोर सतत विदेशातील कोरोनाच्या बातम्या व मृत्यूचा आकडा दिसत होता. ड्युटीवर व घरीही सतत मास्क लावून जीव अगदी गुदमरून गेला होता. दोन्ही मुले डोळ्यासमोर असताना त्यांना जवळ घेणे, त्यांचा लाड करणे, गप्पागोष्टी करणे, खायला घालणे, या सगळ्यांना मुकावे लागले होते. ममत्व देण्याच्या प्रयत्नात हरल्याचे दिसत होते, असे नाझरेकर यांनी सांगितले.