एक पाऊल पुढे.. भाजपाची विधानसभेचीही तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 08:22 PM2019-03-01T20:22:22+5:302019-03-01T20:23:36+5:30
आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष अगदी कंबर कसून तयारीला लागला आहे...
पुणे: आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष अगदी कंबर कसून तयारीला लागला आहे. यात सत्ताधारी असो किंवा विरोधकांसह छोट्या छोट्या पक्षांचा ही देखील तितकाच समावेश आहे. प्रत्येक पक्षाने आपली प्रचाराची वेगवेगळ््या पध्दतीने रणनिती आखली असून मतदारराजाला आपल्याकडे खेचून आणण्याचा अतोनात प्रयत्न देखील सुरु केला आबे. मग यात सत्ताधारी भाजपा मागे कसा राहील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पक्षाने लोकसभेसह विधानसभेची सुध्दा तयारी एकाबाजूने सुरु केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या वेगवेगळ्या उपक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही तयार केली आहे. प्रमुखाने कार्यक्रमांसंबधीचे अहवाल, छायाचित्र आपापल्या वरिष्ठ शाखेकडे पाठवायची आहेत. वरिष्ठांनी ते राज्य शाखेकडे व राज्य शाखेने केंद्रीय कार्यालयाकडे अशी रचना करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा हे स्वत: या सर्व उपक्रमांवर लक्ष ठेवून आहेत. पुण्यातही ३ मार्चला विजय संकल्प रॅली निघणार असून त्याची जोरदार तयारी पक्ष कार्यालयात सुरू आहे. पुण्यातील सर्व म्हणजे आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाचेच आमदार आहेत, त्यामुळे ही रॅली भव्य निघावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते कष्ट घेत आहेत.
------------------------
प्रचारात एकत्र, पक्ष विस्तारात नाही
शिवसेनेबरोबरची युती विधानसभेसाठीही आहे, मग त्यांना विश्वासात न घेता भाजपा अशी स्वतंत्रपणे रॅलीची तयारी का करत आहे अशी विचारणा केली असता भाजपाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी, ह्ययुती असली तरी हा पक्षविस्ताराचा कार्यक्रम आहे व तो तसा करण्याचा अधिकार दोन्ही पक्षांना आहे, असे मत व्यक्त केले. प्रचारात मात्र आम्ही एकत्र असू असे या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.