राज्यात एक हजार जे.एन.१ बाधित; सक्रिय रुग्ण केवळ २४६, पुण्यात संख्या सर्वाधिक
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: March 10, 2024 05:35 PM2024-03-10T17:35:08+5:302024-03-10T17:35:43+5:30
जे.एन.१ हा काेराेनाच्या आतापर्यंत सर्वाधिक प्रबळ असलेल्या ओमायक्राॅन या उपप्रकाराचाही उपप्रकार आहे
पुणे: काेराेनाच्या ओमायक्राॅन या विषाणुचा उपप्रकार असलेल्या जेएन.१ या काेराेनाच्या नव्या विषाणुंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात हजाराहून अधिक म्हणजे १ हजार १२ इतकी झाली आहे. तर त्यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला जिल्हा पुणे ठरला असून पुण्यात आतापार्यंत साडेचारशे रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यापाठाेपाठ ठाणे दुसर-या क्रमांकावर २२५ आणि छत्रपती संभाजीनगर ८३ इतकी आहे.
जे.एन.१ हा काेराेनाच्या आतापर्यंत सर्वाधिक प्रबळ असलेल्या ओमायक्राॅन या उपप्रकाराचाही उपप्रकार आहे. मात्र, हा विषाणु अधिक प्रसार हाेण्याची क्षमता असलेला आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांपूर्वी जेव्हा ताे आला तेव्हा काेराेना रुग्णांची संख्या वाढली हाेती. त्यामुळे देशभरातील आराेग्य यंत्रणा अलर्ट माेडवर हाेती. तेव्हापासून या विषाणुची लागण झालेल्या रुग्णांची संख्येची नाेंद राज्याचा साथराेग विभाग करत आहे. यामध्ये एकुण काेराेना रुग्णांचे जिनाेम सिक्वेन्सिंग करत आहे. त्यामध्ये या विषाणुचे निदान झाल्यास त्याची नाेंद केली जाते.
अशा प्रकारे गेल्या डिसेंबर महिन्यापासून या प्रकारच्या रुग्णांवर आराेग्य विभागाचा वाॅच आहे. मात्र, हे रुग्ण गंभीर हाेत नसल्याने आणि त्यांना हाॅस्पिटलमध्येही भरती करावी लागत नसल्याने त्याचा सुदैवाने फार काही परिणाम झाला नाही. परंतू, तरीही आराेग्य विभाग याची रुग्णसंख्या वाढतेय का यावर लक्ष ठेवून आहे.
या व्हेरिएंटची लागन झालेल्या रुग्णांची संख्या नंदुरबार, यवतमाळ, सिंधुदूर्ग आणि सातारा येथे असून येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. अशा प्रकारे महापालिका व जिल्हा मिळून १६ ठिकाणी या व्हेरिएंटची रूग्णसंख्या १० च्या आत आहे. तर, पुणे व ठाणे वगळता इतर आठ जिल्हयांत रुग्णसंख्या ही १३ ते ८३ च्या दरम्यान आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या अडीचशेवर
राज्यात काेराेनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही अडीचशेवर आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबई महानगरपालिकेत असून ती ७२ आहे. तर ठाणे मनपा ३४, अमरावती मनपा ३३ व इतर ठिकाणीही संख्या ३० पेक्षा कमी आहे.