इंदापूरमध्ये एक हजार मजुरांना मिळाला रोजगाराचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:13+5:302021-09-05T04:14:13+5:30
बारामती : सततच्या लॉकडाऊनमुळे एकीकडे रोजगारांची कमतरता असली तरी इंदापूर तालुक्यातील मजुरांना मात्र रोजगार हमी योजनेमुळे हाताला काम मिळू ...
बारामती : सततच्या लॉकडाऊनमुळे एकीकडे रोजगारांची कमतरता असली तरी इंदापूर तालुक्यातील मजुरांना मात्र रोजगार हमी योजनेमुळे हाताला काम मिळू लागले आहे. तालुक्यात २०२१-२२ या वर्षांतर्गत १ हजार ३९७ मजुरांना या योजनेंतर्गत काम मिळाले आहे. तर आतायर्पंत १ कोटी ४० लाख ३६ हजार रुपयांची कामे या योजनेच्या माध्यमातून झाली आहेत, अशी माहिती इंदापूर पंचायत समितीच्या वतीने देण्यात आली.
महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) स्थानिक व शहरातून गावाकडे स्थलांतर केलेल्या मजुरांना बारामती तालुक्यात हक्काचा रोजगार उपलब्ध होत आहे. शेकडो मजुरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. इंदापूर तालुक्यात पंचायत समिती स्तर आणि तहसील कार्यालय स्तर यामध्ये २१५ कामांच्या माध्यमातून १ हजार ३९७ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून गरजू मजुरांच्या हाताला तर काम मिळतेच परंतू याचे योग्य नियोजन झाल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलविण्याची ताकत या योजनेत आहे. हे इंदापूर तालुक्याच्या रोजगार हमी योजना विभागाने दाखवून दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक कामात विकासाची गंगा ठरू शकणाऱ्या या योजनेमुळे इंदापूर शहराच्या आसपासच्या मजुरांचा देखील हाताला काम मिळू लागले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक मजुराला किमान २४८ रुपये मजुरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढ देखील होते. इंदापूर तालुक्यातील रस्ता, घरकुल, वैयक्तिक विहीर, पाणंद रस्ते, गाय गोठा, वृक्षलागवडी, रोपवाटिका या पंचायत स्तरावरील तर तहसील स्तरावरील रेशीम विकास तुती लागवड अंतर्गत तीन वर्ष मुदतीचे व कृषी विभागाच्या वतीने फळबागा लागवडी केल्या जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव व सततच्या संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न मोठा आहे. परिणामी या आणीबाणीच्या स्थितीमध्ये अनेक मजूर कुटुंबाना रोजगार हमी योजनेने आधार दिला आहे.
--------------------------
या योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त सार्वजनिक लाभाची कामे व्हावी यासाठी इंदापूर तालुक्यात प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये मजुरांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तालुक्यात पाणंद रस्ते, पाणी पुरवठा विहिरी व वृक्षलागवडी, रोपवाटिका, घरकुल आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
- विजयकुमार परीट
गटविकास अधिकारी, इंदापूर पंचायत समिती
----------------------------------
इंदापूर तालुक्यात रोजगार
हमीअंतर्गत २०२१-२२ मधील कामे
पंचायत समितीस्तर
कामाचे नाव-कामे-मजूर
घरकुल-८२- ३२८
वृक्ष लागवड-३३- १६५
फळबागा-२- १४
विहिरी- १३- १५६
गायगोठा-१०- ५०
रोपवाटिका-२- ३०
पाणंद रस्ता-४- ४८
-----------------------------
तहसीलस्तरावरील कामे (२०२१-२२)
कामाचे नाव-कामे-मजूर
वृक्ष लागवड-४०- ४००
रेशीम- १३- ७८
- तर तालुका कृषी विभागांतर्गत फळबागांची १६ कामे झाली असून त्याअंतर्गत १२८ मजुरांना काम मिळाले.