देशात उभारणार एक हजार क्रीडा केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:42+5:302021-01-19T04:12:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहात असावा हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहात असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे तर स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातल्या सुमारे ७०० जिल्ह्यांत सुमारे हजार ‘खेलो इंडिया निपुणता’ केंद्रे उभारण्याची योजना आहे,” असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीत उभारण्यात आलेल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रा’चा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. १८) झाला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय संचालिका सुश्मिता जोत्सी, खासदार गिरीश बापट, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी केंद्राच्या तांत्रिक सुविधांसंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालय व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) सोबत एक सामंजस्य करार देखील करण्यात आला. दरम्यान, राज्यात तीन खेलो इंडिया निपुणता केंद्रांची स्थापना करण्यात येत असून यातील एक केंद्र पुण्यात आहे.”
चौकट
तेजस्विनी, राही, स्वरुपचा सत्कार
सन २०२१ मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात पात्र ठरलेल्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वरूप उन्हाळकर व बॅडमिंटनमध्ये १९ वर्षांखालील गटात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू वरुण कपूर यांचा सत्कार या वेळी रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला.
चौकट
९० खेळाडू, ३८ कोटी
ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, “पुण्यातील राज्य निपुणता केंद्रात नेमबाजी, सायकलिंग व अँथलिट या क्रीडाप्रकारातील प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण ९० खेळाडूंना प्रशिक्षित केले जाईल. यादरम्यान खेळाडूंचे प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्थेचा समावेश असेल. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत ३८.२ कोटी रुपये असून खेळाडूंच्या निवडीचे काम सध्या सुरू आहे.” आजवर केंद्राकडून शूटिंग रेंजसाठी ३.७० कोटी, स्पोर्ट्स सायन्स सेंटरसाठी १.३० कोटी तर इतर आवर्ती खर्चासाठी २.७५ कोटी दिल्याचे ते म्हणाले.
फोटो ओळ - ‘खेलो इंडिया राज्य निपुणता’ केंद्राचे लोकार्पण केल्यानंतर किरेन रिजिजू यांनी २०२१ च्या टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वरूप उन्हाळकर याचा सत्कार केला.