पुणेकरांना मिळणार एक वेळच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:36 AM2018-10-29T05:36:00+5:302018-10-29T06:50:49+5:30

प्रशासनाचे नियोजन पूर्ण; पाच तासांची वेळ गाठणे कठीण

One time water will be available to Puneites | पुणेकरांना मिळणार एक वेळच पाणी

पुणेकरांना मिळणार एक वेळच पाणी

Next

पुणे : पाटबंधारे खात्याने तंबी दिल्यामुळे आता पुणे शहराला एकवेळच पाणी मिळणार आहे. धरणातून दिवाळीनंतर फक्त १ हजार १५० एमएलडी पाणीच दररोज मिळणार असल्याने महापालिकेने त्याचे नियोजन आतापासूनच सुरू केले आहे. त्याची पूर्वतयारी गेल्या चार दिवसांपासून सुरू असल्यामुळे शहरात काही ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र आता तांत्रिक तयारी पूर्ण झाल्यामुळे सलग पाच तास पुरेशा दाबाने शहराला पाणी मिळेल, असे सांगण्यात येत असले तरी काही भागात विशेषत: उपनगरांमध्ये ते कठीण असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

पर्वती, वारजे, लष्कर व होळकर अशी महापालिकेची चार जलशुद्धीकरण केंदे्र आहेत. या केंद्रांच्या कक्षेत शहरातील विविध भाग येतात. त्यानुसार महापालिकेच्या टाक्या आहेत. टाक्यांना मुख्य जलवाहिन्या व त्यावर ग्राहकांचे नळजोड, अशी व्यवस्था आहे. याच प्रकारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होत असतो. टाक्या भरण्याचे, त्यातून पाणी सोडण्याचे व त्यानंतर मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह सोडण्याचे वेळापत्रक आहे. यापूर्वीचे वेळापत्रक वेगळे होते. आता सलग पाच तासच पाणी सोडायचे असल्यामुळे नव्याने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकाची काही परिसरात चाचणी घेण्यात आली. त्यातून काही दोष निर्माण झाले. ते दूर करण्यात आले. त्यामुळे आता सोमवारपासून (दि. २९) नव्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी दिली. उपनगरांमध्ये तसेच ज्याठिकाणी यापूर्वी पाणी येतच नव्हते तिथेही आता पाणी व्यवस्थित मिळेल. याचे कारण ज्या भागात पाणी बराच वेळ किंवा २४ तास असायचे ते आता बंद होणार आहे. त्यामुळे टाक्यांमधील पाण्याची लेव्हल चांगली राहून पुढील भागाला पाणी मिळेल, असा विश्वास गेडाम यांनी व्यक्त केला. पाण्याची अडचण निर्माण होईल तिथे टँकरने पाणी पुरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: One time water will be available to Puneites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.