धरणांत ४८ तासांत वाढले एक टीएमसी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:28+5:302021-07-21T04:09:28+5:30
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरण प्रकल्पात दोनच ...
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरण प्रकल्पात दोनच दिवसांत १.७ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. गेल्या बारा तासांत पानशेत, वरसगाव व टेमघर धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे.
पुणे महापालिका व परिसराला आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणात रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९.८५ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे धरणात ११.५५ टीएमसीपर्यंत पाणी वाढले. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर चांगला होता. त्यामुळे गेल्या बारा तासात पानशेत धरणात ५० मिलिमीटर, वरसगाव धरणात ४२ मिलिमीटर, टेमघर धरणात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरतील, अशी शक्यता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी २० जुलै २०२० रोजी धरण प्रकल्पात एकूण ९.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. मंगळवारी (दि. २०) धरण प्रकल्पात एकूण ११.५५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण प्रकल्पात २.०८ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. गेल्या २४ तासात टेमघर,पानशेत, वरसगाव धरणात ८५ ते ६० मिलिमीटर तर खडकवासला धरणात २० मिलिमीटर एवढा पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ येणार नाही.
चौकट
खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा
धरणाचे नाव टीएमसी टक्के
खडकवासला ०.९० ७४.७२
पानशेत ५.०१ ४७.०७
वरसगाव ४.७० ३६.६४
टेमघर ०.९४ २५.३५