एकीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्या बहिणींनी गमावला जीव; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 02:53 PM2023-06-01T14:53:21+5:302023-06-01T14:54:04+5:30
दोन्ही बहिणी वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईवरून मंचरला आल्या होत्या
मंचर: एकलहरे गावच्या हद्दीत घोडनदी काठावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरती श्याम खंडागळे (वय18) व प्रीती शाम खंडागळे (वय 17 रा. मुंबई) अशी त्यांची नावे असून ही घटना आज सकाळी बारा वाजता घडली आहे.
वाढदिवस असल्याने या बहिणी मुंबई येथून एकलहरे येथे आल्या होत्या. रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी कपडे धुण्यासाठी घोडनदीवर पाचजणी गेल्या होत्या. घोडनदीवर एकलहरे गावच्या हद्दीतील नवीन पुलाजवळ आरती शाम खंडागळे, प्रीती श्याम खंडागळे, कावेरी बाबासाहेब आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे हे सर्वजण कपडे धुत होते. त्यावेळी कावेरी आरझेंडे हिचा पाय सटकून ती घोडनदीच्या पाण्यात पडली व बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती शाम खंडागळे व प्रीती श्याम खंडागळे या पाण्यात उतरल्या. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यादरम्यान पाय घसरून पडलेली कावेरी बाबासाहेब आरझेंडे ही बारा वर्षाची मुलगी वाचली आहे. कुशा नारायण घोरपडे या सुद्धा मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या. मात्र नाकात तोंडात पाणी जाऊ लागल्याने त्या पुन्हा माघारी फिरल्या यावेळी तेथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष डोके, उपसरपंच दीपक डोके, पोलीस पाटील निखिल गाडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल डोके, दीपक जाधव, अक्षय धोत्रे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली पाण्यात बुडलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढून गौरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्या दोघी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.