जो मोबाईलवरी विसंबला, त्याचा कार्यभार बुडाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:20+5:302021-07-09T04:08:20+5:30
पुणे : मोबाईलवर विसंबून असल्याने आपल्या जोडीदाराचा किंबहुना स्वत:चाही दुसरा नंबर लक्षात राहत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...
पुणे : मोबाईलवर विसंबून असल्याने आपल्या जोडीदाराचा किंबहुना स्वत:चाही दुसरा नंबर लक्षात राहत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी विविध वयोगटातील दहा व्यक्तींशी संपर्क साधला. दहापैकी ७ जणांना कुटुंबीयांचा किंवा जोडीदाराचा संपर्क क्रमांक पटकन आठवून सांगता आला नाही. सातपैकी ३ जणांना स्वत:चा दुसरा नंबरही पाठ नव्हता. मोबाईल क्रमांक लक्षात नसणाऱ्या ७ व्यक्ती २५ ते ४५ या वयोगटातील होत्या. ज्या तीन व्यक्तींना जोडीदाराचा किंवा कुटुंबातील सदस्याचा नंबर पटकन सांगता आला. ते ५० ते ६५ या वयोगटातील होते. त्यामुळेच तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांची स्मरणशक्ती चांगली असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
‘हातात मोबाईल येण्यापूर्वी नातेवाईक, आप्तेष्टांचे लँडलाईन नंबर डायरीत लिहून ठेवण्याची सवय होती. नेहमीच्या वापरातील फोन नंबर तर अगदी तोंडपाठ असायचे. कॉईन बॉक्सवरून किंवा एसटीडी बूथमधून फोन करताना डायरीच्या मदतीविना नंबर एसटीडी कोडसह फिरवला जायचा’, अशी आठवण ५५ वर्षीय संजय जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितली. मोबाईलवर विसंबून राहिल्यामुळे स्मरणशक्तीला चालनाच मिळत नाही. ज्येष्ठांना अजूनही पूर्वीचे संपर्क क्रमांक लक्षात राहतात. तरुणवर्गाला मात्र मोबाईलचाच आधार घ्यावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकणारी सलोनी शिंदे म्हणाली, ‘आजकाल सिंगल सिमचे फोन खूप कमी जणांकडे असतात. बहुतांश लोक ड्यूअल सिमकार्डचा स्मार्टफोन वापरतात. कॉलिंगसाठी एक आणि इंटरनेट वापरासाठी एक असे दोन सिम वापरले जातात. त्यामुळे बरेचदा स्वत:चाच दुसरा मोबाईल नंबर लक्षात राहत नाही. मित्र-मैत्रिणींचे नंबर लक्षात राहणे दूरच; आई-बाबांचा नंबरही पाठ होत नाही. कोणाशीही बोलायचे असले की पटकन मोबाईल काढायचा आणि नाव शोधून थेट फोन लावायची सवय लागून गेली आहे.’
----------------
तोटे :
- स्वत:च्या मेमरीपेक्षा मोबाईलच्या मेमरीवर जास्त विश्वास
- नंबर डायरीत लिहून ठेवण्याची, डायल करण्याची सवय मोडली
- मोबाईल हातात घेऊन थेट कॉन्टॅक्ट लिस्टमधून नंबर लावण्याची सवय
- स्मरणशक्तीला चालना मिळत नाही
- एखाद्या वेळी मोबाईल बंद पडल्यास अडचण होते
------------------
काय करायला हवे?
- जवळच्या किमान तीन व्यक्तींचे नंबर तोंडपाठ असावेत
- मोबाईल क्रमांक डायरीतही लिहून ठेवावेत
- दहा आकडी नंबरची फोड करून क्रमांक लक्षात ठेवणे सोपे जाते