सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा अन् तब्बल महिन्यानंतर एक वर्षाच्या बाळाला मिळाली आईची कूस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 09:51 PM2020-04-22T21:51:13+5:302020-04-22T22:23:49+5:30
खासदार सुळे यांची ही मदत एक आई म्हणून कायम स्मरणात राहील.
पुणे: मगरपट्टा परिसरात स्थायिक असलेले संगणक अभियंते पुनम व सचिन फुसे यांचा ११ महिन्यांचा मुलगा २० मार्चपासून मावळ येथे पुनम यांच्या आई- वडिलांकडे होता. दरम्याच्या काळात लॉकडाउन लागू झाला. तो १४ एप्रिलपर्यंत उठेल असा फुसे दांपत्याचा अंदाज होता. परंतु, तो ३ मे पर्यंत वाढला. त्यामुळे फुसे कुटुंब अस्वस्थ झाले. बाळाला भेटण्यासाठाची पुनम यांची धडपड सुरू झाली. ते देखील आईच्या आठवणीने सारखे रडत होते. त्यामुळे आजी- आजोबांसह फुसे दांपत्य अस्वस्थ होते. बाळाच्या तब्येतीवरही याचा परिणाम होत होता.
यातून मार्ग काढण्यासाठी पूनम यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्यामार्फत संपर्क साधला. खासदार सुळे यांनी यातील गांभीर्य लक्षात घेत लगेचच गृहखात्याशी संवाद साधला. पुनम यांना डिजिटल पास मिळावा असा प्रयत्न त्यांनी सुरू केला. शहराची हद्द ओलांडली जाणार असल्याने असा पास मिळणे अवघड होते. सुळे यांनी गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय झाले आहे ते समजावून सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अदिती नलावडे, मनाली भिलारे यांनी त्याचा पाठपुरावा केला.
अखेर फुसे दांपत्याला २० एप्रिल रोजी पोलिसांकडून डिजिटल पास मिळाला. त्यानुसार प्रवास करून त्यांनी बाळाची भेट घेतली. बाळाने आईला पाहताच, आणि आईने बाळाला पाहताच तिथे ममता, वात्सल्य यांचा पूरच आला.
पूनम म्हणाल्या, खासदार सुळे यांची ही मदत एक आई म्हणून कायम स्मरणात राहील. सुळे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी म्हणून अशा मदतीची संधी मिळाली याचे समाधान आहे. बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजय खोत, मनिष बोरकर, पुण्यातील स्नेहल शिनगारे यांनीही यामध्ये सहकार्य केले.