स्वायत्त महाविद्यालयांसाठी जाचक नियमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:27+5:302021-08-29T04:14:27+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यापीठांशी संलग्न सक्षम महाविद्यालयांनी स्वायत्तता घ्यावी, ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यापीठांशी संलग्न सक्षम महाविद्यालयांनी स्वायत्तता घ्यावी, असे आवाहन केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरील मोठ्या अधिकाऱ्यांकडून केले जाते. पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे शहरातील बहुतांश महाविद्यालयांनी स्वायत्तता घेतली आहे. त्यात फर्ग्युसन, स.प. महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय आदींचा समावेश आहे.
महाविद्यालयांचा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करता यावेत, विद्यार्थ्यांना सुध्दा नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध व्हावेत. तसेच विद्यापीठाचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने महाविद्यालयांना स्वायत्तता दिली जात आहे. मात्र, स्वयत्तता केवळ कागदावरच राहत आहे. इतर संलग्न महाविद्यालयाप्रमाणे स्वायत्त महाविद्यालयांना सुध्दा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी एक वर्ष अगोदर ३० सप्टेंबरपूर्वी विद्यापीठास प्रस्ताव सादर करून विद्यापीठाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाची मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी अभ्यासक्रमाचा संपूर्ण आराखडा विद्यापीठाला सादर करावा लागतो. यूजीसीच्या नियमावलीनुसार स्वायत्त मिळालेल्या महाविद्यालयांना नवनवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करता येतात. त्यासाठी विद्यापीठाच्या मान्यतेची आवश्यकता नसते. परंतु, विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या नव्या नियमावलीमुळे शिक्षण वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
----------------------------------