जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:46+5:302021-06-29T04:08:46+5:30
पुणे: ‘तू भांडणात मध्यस्थी करतो का? खूप मोठा भाई झाला आहेस का? आता आम्ही तुला संपवून टाकतो, अशी धमकी ...
पुणे: ‘तू भांडणात मध्यस्थी करतो का? खूप मोठा भाई झाला आहेस का? आता आम्ही तुला संपवून टाकतो, अशी धमकी देत लहान मुलांची भांडणे सोडवल्याच्या रागातून कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी फेटाळला.
वृषभ उर्फ गुड्ड्या सुनील गायकवाड (वय १९, रा. औंध) असे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी इतर तिघांना अटक केली आहे. आकाश गायकवाड (वय २४) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आकाशच्या आईने फिर्याद दिली आहे. ७ ऑक्टोबर २०२० रोजी औंध परिसरात ही घटना घडली होती.
फिर्यादी राहत असलेल्या वसाहतीमध्ये लहान मुलांची झालेली किरकोळ भांडणे आकाश याने मध्यस्थीने सोडवली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी आकाशच्या डोक्यात, हातावर, पाठीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर वृषभ याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाला सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्यात वापरलेले कोयते त्याच्याकडून जप्त केले आहे. त्याला जामीन मिळाल्यास तो फिर्यादीच्या कुटुंबावर दबाव टाकू शकतो. तसेच त्याचा जामीन मंजूर झाल्यास तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.