ओतूरला कांदा लिलाव पाडले बंद : केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणाचा शेतकऱ्यांनी केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 11:38 AM2019-10-04T11:38:22+5:302019-10-04T11:40:03+5:30
केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर येथील उपबाजारपेठेत गुरुवारी शेतकºयांनी केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीचा निषेध करीत बाजारातील कांद्याले लिलाव बंद पाडले. निर्यातबंदीमुळे दोन आठवड्यांपासून सातत्याने कांद्याच्या भावात घट होत आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.
ओतूर (ता. जुन्नर) येथील उपबाजारात दर गुरुवारी आणि रविवारी कांद्यांचा मोठा बाजार भरतो. गुुररुवारी (दि. ३) या बाजारात १५० ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. गेल्या आठवड्यात उत्तम प्रकारच्या कांद्याला ३०० रुपये बाजारभाव व आजच्या बाजारात याच कांद्याला २०० ते २८० रुपये भाव जाहीर झाल्याने शेतकरी संतप्त झाले. यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि बाजारातील कांद्याचे लिलाव बंद पाडले.
ओतूर मार्केटमधील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले, हे वृत्त जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांना कळविण्यात आले. त्या दोघांनी ओतूर विभागातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे, योगेश शेटे नासीर मनियार यांच्याशी संपर्क साधून त्यांना सूचना केल्या. शेतकºयांनी जो कांदा विक्रीस आणला आहे, त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी, व्यापारी यांची संयुक्त बेठक घेऊन विचारविनिमय करा. तसेच, योग्य मार्ग काढून कांद्याचे लिलाव करून घ्या, ज्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार नाही. रविवारी पुन्हा कांदा बाजारात विक्रीसाठीआणायचा की नाही ते शेतकरी ठरवतील. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने कमी होत असल्याने ऐन दिवाळीत आनंदीत असलेले शेतकरी हवालदील झाले आहेत
.................
कांदा निर्यातबंदीमुळे ओतूर येथील मार्केटमध्ये कांद्याचा भाव घसरला़ दोन आठवड्यांपूर्वी १० किलो कांद्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत होते़ मात्र, आता हाच दर २०० ते २५० रुपयांवर आला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन कांदा लिलाव बंद पाडला़ जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे हित जोपासत असते़ शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांमध्ये समेट घडविण्यात आला़ -अॅड़ संजय काळे, सभापती, जुन्नर बाजार समिती़
..........
कमी दरामुळे शेतकºयांनी कांदा लिलाव प्रक्रिया बंद पाडली़ वास्तविक पाहता, कांदा निर्यातबंदीमुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली़ जवळपास निम्म्याने दर कमी आल्याने शेतकऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला नाही़ केंद्र सरकारचे निर्यातबंदीचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक आहे़- बाळासाहेब होनराव, शकील तांबोळी, व्यापारी
..............
ओतूर मार्केटमध्ये कमी दराने कांद्याचा लिलाव सुरू होता़ हा दर उत्पादकांना न परवडणारा आहे़ गत आठवड्यामध्ये ५०० रुपये भाव मिळला होता़ मात्र, आज निम्म्यापेक्षा म्हणजे २०० रुपये भाव मिळाला; त्यामुळे उत्पादकांनी एकत्रित येऊन सुरू असणारा लिलाव बंद पाडला़ - शांताराम गायकर, राहुल शिंदे व प्रभाकर शिंदे, कांदा उत्पादक
........
जिल्ह्यात कांद्याच्या भावाला उतरती कळा
निरगुडसर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास सरकारने हिसकावून घेतला असल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारीसुद्धा मोठ्या प्रमाणात भाव घटले. यामुळे चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांची आशा मावळली आहे.
रविवारी (दि. २९) कांद्याचे बाजारभाव दहा किलोस ३०० ते ४०० रुपये होते. सुट्टीचा दिवस असूनही अचानक दुपारी केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली. यामुळे रविवारपासून कांद्याच्या भावात रोज १० किलोस २० ते २५ रुपयांची घट होऊ लागली आहे. पुणे, मुंबई, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये १० किलोस ३०० ते ३३० भाव मिळाला. तर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ३) हाच बाजारभाव २५० ते २८० रुपये दहा किलो इतका घसरला. आठ दिवसांपूर्वी ४० ते ५० रुपये किलो विकला जाणारा कांदा निर्यातबंदीने २५ ते २८ रुपये किलो विकला जाऊ लागला. त्यामुळे बाजारभावात कमालीची घसरण होऊ लागली आहे.
गेले दोन तीन वर्षांत कांदा पिकविण्यास झालेला खर्च पण वसूल न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी बराखीतच कांदे खराब झाले.
काहींना फेकून द्यावे लागले. यावर्षी चांगले पैसे होतील, मुलाबाळांची दिवाळी चांगली होईल, या आशेवर बळीराजा होता पण सगळ्यावर पाणी फिरले.
...........