पावसामुळे कांद्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:25 AM2018-06-12T02:25:20+5:302018-06-12T02:25:20+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतात साठवण करून ठेवलेला कांदा भिजू नये, म्हणून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी काढला आहे.
अवसरी - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतात साठवण करून ठेवलेला कांदा भिजू नये, म्हणून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी काढला आहे. अल्पभूधारक शेतकºयांना शासनाने कांदाचाळ बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी करीत आहे.
घोडनदी व डिंभा उजवा कालवा बारमाही पाण्याने वाहत असल्याने अवसरी, निरगुडसर, पारगाव, देवगाव, लाखणगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी, पोंदेवाडी या गावातील शेतकरी वर्षाला नगदी पिके पैसे मिळवून देणारी पिके घेत असतात. वरील गावांमध्ये ऊसलागवड, कांदा, बटाटा, गहू, भाजीपाला मोठ्या प्रमाणात करीत असतात.
शेतकरी मार्च महिन्यात कांदा लागवड करतात व हा कांदा मे महिन्यात काढणीसाठी येतो. परंतु मे महिन्यात कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने मोठे शेतकरी कांदा बराकीत ठेवतात. मात्र अल्पभूधारक शेतकºयांकडे कांदाचाळ नाही, असे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विकून टाकतात.
रिमझिम पाऊस झाल्याने शेतकºयांनी शेतात ठेवलेला कांदा विक्रीसाठी भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या दहा किलो कांद्याला ७५ ते ८० रुपये दर मिळत आहे. कांदा विकून परवडत नाही. परंतु पावसाने भिजून नुकसान होण्यापेक्षा मिळेल ते पैसे पदरात पाडून घ्यावे, म्हणून शेतातील ठेवलेला कांदा भरताना शेतकरी व्यस्त आहे.