ढगाळ हवामानामुळे कांदा पडतोय ‘आजारी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 03:20 PM2019-12-26T15:20:23+5:302019-12-26T15:30:01+5:30
बाजारभावाने तारल्याने उत्पादक कष्टाने जगतोय
शिरूर ( शेलपिंपळ्गाव ) : वातावरणातील हवामान बदलाचा मागास कांदा पिकासह हंगामातील अन्य पिकांनाही मोठा फटका बसू लागल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हंगामातील मागास गहू, मका, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लॉवर तसेच महत्त्वाच्या तोडीव पिकांवर मावा, तसेच करपा रोगराईचे सावट पसरू लागले आहे. परिणामी रोगराईच्या विळख्यातील पिकांचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे.
चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात शेतकऱ्यांना दूषित हवामानाशी दोन हात करीत पीक उत्पादन काढावे लागत आहे. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदापिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. मात्र, थंडीच्या आगमनानंतर कांद्याला बोटावर मोजता येतील इतके दिवसच पोषक वातावरण प्राप्त झाले होते. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालावधीत पोषक हवामानाने साथ सोडल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे. परिणामी, कांदा उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे.
....
चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदापीक वाया गेले आहे. सध्या परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला चांगला दर प्राप्त होत आहे. मात्र पिकाच्या एकरी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट जाणवत आहे. परंतु बाजारभावाने तारल्याने पिकापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या मागास कांदा लहरी हवामानाला बळी पडत आहे.- सर्जेराव मोहिते, शेलपिंपळगाव