कांद्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:05+5:302020-12-25T04:10:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: जुना कांदा संपला असून नवीन कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत ...

Onion imports declined | कांद्याची आवक घटली

कांद्याची आवक घटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: जुना कांदा संपला असून नवीन कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक घटली आहे. गुरुवारी ३ हजार ८८७ पिशवी कांद्याची आवक झाली. एक नंबर गोळा कांद्यास दहा किलो २३० ते २५१ रुपये असा भाव मिळाल्याची माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

यावर्षी कांद्याचे बाजारभाव वारंवार अस्थिर राहिले आहेत. सुरुवातीला खूपच कमी बाजारभाव मिळाला. त्यावेळी कांद्याचे भांडवल शेतकर्‍यांच्या अंगावर आले. मध्यंतरी कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला. दहा किलो १२०० रुपये असा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव कांद्याला मिळाला होता. मात्र, नंतर हे बाजारभाव कमी कमी होत गेले. शेतकऱ्यांकडे जुना कांदा शिल्लक राहिलेला नाही. अवकाळी पाऊस तसेच निसर्गाने साथ दिली नसल्याने नवीन कांदा लागवड खूपच कमी क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे कांद्याची आवक खूपच कमी होत आहे. मंगळवारी बाजार समितीत ३ हजार ९५३ पिशवी आवक झाली होती. मात्र, आज गुरुवारी ही आवक ३ हजार ८८७ पिशवी झाली. दिवसेंदिवस कांद्याची आवक कमी होत चालली आहे. इतर वर्षांची तुलना करता डिसेंबर महिन्यात कांदा आवक घटते. मात्र, इतर वर्षापेक्षा यावेळी आवक जास्तच घटली आहे. कांद्याचे भाव कमी झाले आहेत. आज एक नंबर गोळा कांदा दहा किलोला २३० ते २५२ रुपये, दोन नंबर कांदा १८० ते २३० रुपये, गोल्टी कांदा १२० ते १८० रुपये, तर बदला कांदा ६० ते १३० रुपये या भावाने विकला गेल्याची माहिती सचिव सचिन बोराडे यांनी दिली.

Web Title: Onion imports declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.