कांद्याने केला वांधा; उत्पादनाचा खर्चही निघेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:01 AM2019-01-31T02:01:40+5:302019-01-31T02:02:48+5:30
कांदा उत्पादक शेतकरी संकटात
निमोणे : निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरात रब्बी हंगामातील कांदाकाढणी सुरू झाली असूनही, कवडीमोल बाजारभाव असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. निमोणे परिसरातील करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वीसह एकूणच शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होते. शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून आजपर्यंत याकडे पाहिले जात होते. तसे कांदा उत्पादन करणे जिकिरीचे, किचकट असून त्यासाठी खर्चही भरपूर येतो.
एक एकर कांदा उत्पादनासाठी साधारण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. शिवाय, तालुक्यात औद्योगिक वसाहत असल्याने शेतीकामांसाठी स्थानिक मजुरांचा तोटा भासतो. त्यासाठी बाहेरून मजूर आणावे लागतात. त्यासाठी शेतकºयाला जादा पैसे मोजावे लागतात. शिवाय, विजेचा आणि चासकमानच्या पाण्याचा नेहमी लपंडाव असतो. यासाठीही शेतकºयाला मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्याच्या नदीकाठच्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून बागायती शेती व्यवसायामुळे जामिनाचा पोतच खराब झाला आहे. यामुळे उत्पादनक्षमता घटली आहे. किमान उत्पादन मिळविण्यासाठी जास्तीच्या खतांचा वापर करावा लागतो. तर, बदलत्या हवामानामुळे रोगराईचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. कमी प्रतीचा कांदा उत्पादन होते. त्याच्या निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर करावा लागतो आणि या सर्वांमुळे उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो.
या एकरामधून साधारण २०० ते २५० पिशव्या कांदा निघतो. सध्याच्या ५ ते ७ रुपये प्रतिकिलोग्रॅम या बाजारभावाने त्याचे १० हजार ते १५ हजार रुपये मिळतात. म्हणजे एवढे पाच महिने काबाडकष्ट करूनही एकरी ३० ते ४० हजार रुपयांचा तोटा होतो. कमी प्रतीचा कांदा असेल तर पदरात दमडीही पडत नाही. बळीराजाला रिकाम्या हाताने परतावे लागते. सलग तीन वर्षांपासून ही स्थिती आहे. मागील वर्षीचा कांदा बाजारभावाच्या अपेक्षेने ठेवलेला तसाच पडून आहे. तो सडायला लागलाय. नवीन कांदापण काढणीला आलाय. या सर्व कांद्याचे करायचे काय? असा शेतकºयांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून शेतकरी कांदा फेकून देत असल्याने कर्जाचा डोंगर वाढतोय. या कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजा पुरता गाडला गेला आहे.
या कांदाशेतीने शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे. कांदा उत्पादनच काय, पण शेतीच करावी की नाही? असा गहन प्रश्न शेतकºयापुढे यांपुढे निर्माण झाला आहे. शेती आणि शेतकरी संपविण्याचे शासनाचे हे धोरण आहे.
- संतोष भाऊसाहेब काळे,
कांदा उत्पादक शेतकरी
सरकारने शेतकºयांवर आपल्याच तोंडात मारून घेण्याची वेळ आणली आहे. एवढ्या मोठ्या कष्टाने, रात्रीचा दिवस करून पिकविलेला कांदा मातीमोल भावाने विकताना शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. तर, काही शेतकरी वाटखर्चाला मोताद झाले आहेत. बळीराजाची ही क्रूर चेष्टा थांबण्याची गरज आहे.
कर्जमाफी आणि पॅकेजच्या पोकळ घोषणा करून या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याऐवजी त्याच्या शेतमालास योग्य भाव दिल्यास कोणत्याही योजनेची या जगाच्या पोशिंद्याला गरज भासणार नाही, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.