कांद्याची आळेफाटा बाजारात विक्रमी आवक, १५ वर्षांतील विक्रम मोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:10 AM2018-01-29T03:10:38+5:302018-01-29T03:10:59+5:30
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारच्या आठवडे बाजारात कांद्याच्या आवकेने १५ वर्षांतील विक्रम मोडला. जवळपास ६0 हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली.
आळेफाटा - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारच्या आठवडे बाजारात कांद्याच्या आवकेने १५ वर्षांतील विक्रम मोडला. जवळपास ६0 हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली.
कांद्याचे चांगले आवकेसाठी आळेफाटा उपबाजार पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार व रविवार कांदा लिलाव होतात. तालुक्यातील व शिरूर तसेच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, अकोले येथीलही कांदा विक्रीस येत असल्याने अगदी वर्षभर आवक येथे टिकून राहते. सहा वर्षांपूर्वी येथे विक्रमी अशी ४७ हजार कांदा गोणी आवक झाली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात ४२ हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. तर शुक्रवारच्या बाजारात चांगल्या प्रतीच्या काद्यांस प्रतिदहा किलो २८५ असा दर मिळाला.
जवळपास साठ हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या तर दरात घसरण झाली. प्रतवारीप्रमाणे प्रतिदहा १00 ते २३0 असा दर मिळाला असल्याचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक आनंद रासकर व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
सगळीकडे गोणीच गोणी..
शनिवारी रात्रीपासूनच शेतकरी कांदा गोणी विक्रीस आणत होते. यामुळे उपबाजाराचे बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लिलावगृहाबाहेरही कांदा गोणी ठेवल्या होत्या. यामुळे सगळीकडे कांदा गोणीच दिसत होत्या.