कांदा अनमोल; टोमॅटो मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 02:38 PM2019-09-21T14:38:16+5:302019-09-21T14:39:27+5:30

मागील दोन वर्षांपासून कांद्याला योग्य दर न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे तोट्यात होता...

Onion is precious; Tomato prizes is decreased | कांदा अनमोल; टोमॅटो मातीमोल

कांदा अनमोल; टोमॅटो मातीमोल

googlenewsNext
ठळक मुद्देकिरकोळ बाजारात कांदा ६० रुपये किलो : टोमॅटो ५ ते १० रुपये किलो

विलास शेटे - 
मंचर : मागील काही दिवसांपासून कांद्याला मिळणारा जेमतेम बाजारभाव आता उच्चांकी झाला आहे. कांद्याला १० किलोस तब्बल ५०१ रुपये इतका उच्चांकी भाव मिळत असून तो अजून वाढण्याची शक्यता आहे. इतर राज्यात झालेली अतिवृष्टी व त्यामुळे वाया गेलेले कांदा पीक हे भाववाढीचे प्रमुख कारण आहे. खरीप हंगामातील सर्वांत महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणाऱ्या टोमॅटो पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. किरकोळ बाजारात किलोला १० ते २० रुपये  आणि क्रेटला शंभर ते दोनशे रुपये भाव मिळत आहे. 
मागील दोन वर्षांपासून कांद्याला योग्य दर न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे तोट्यात होता. या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही. परंतु गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. मागील जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये कांद्याला दहा किलोला ८० ते १२० रुपये असा दर मिळत होता. मागील एक महिन्यापासून कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारामध्ये कांद्याला दहा किलोस गोळा कांदा ५०१ रुपये, नंबर १-४००-४७०, नंबर २- ३८०-४००, गोलटा २५०-३२० बदला १००-२००  रुपये असा दर मिळत आहे. 
या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा बºयापैकी याआधीच विकला आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे व हवेतील आर्द्रतेमुळे शेतकºयांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे. सड वाढली गेली त्यामुळे अचानक कांद्याच्या पुरवठ्यामध्ये घट झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढायला लागले आहेत.
मागील दोन वर्षांत कांद्याला कमी भाव मिळाला होता. समाधानकारक दर न मिळाल्यामुळे व कांदा निर्यात न झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु आता बाजारभाव वाढल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांनी कांदा 
चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणायला सुरुवात केली आहे. 
..............
कांद्याचे दर अजूनही वाढण्याची शक्यता आहे. कारण बाजारांमध्ये ज्याप्रमाणे कांद्याला मागणी आहे. त्या पटीने कांदा बाजारांमध्ये उपलब्ध होत नाही. आणि त्यामुळेच कांद्याचे भाव भविष्यात देखील वाढण्याची शक्यता आहे. सरकारने बाहेरच्या देशातून पाकिस्तान, चीन, इजिप्त, आणि अफगाणिस्थान या देशातून दोन हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासंबंधीच्या निविदादेखील काढण्यात आलेल्या आहेत. तो कांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये बाजारात आणि दिवाळीनंतर खरिपाचा नवीन कांदा बाजारामध्ये यायला सुरुवात होईल, त्यावेळेला कांद्याचे दर पडण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत बाहेरच्या देशातील आयात केलेला कांदा बाजारपेठेमध्ये येत नाही आणि खरिपाचा कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. 
........
मागील दोन वर्षांपासून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळाला नाही. आता कुठेतरी शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. अशावेळी सरकारने निर्यातीवरून बंधने न घालता व कांद्याची आयात न करता शेतकºयांचा विचार केला पाहिजे. खाणाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित सरकारने डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला पाहिजे.  
- प्रभाकर बांगर, शेतकरी
..........
दोन वर्षांनंतर कांदा उत्पादकांना समाधानकारक दर मिळाला गेला आहे. दोन वर्षांपासून तोट्यात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर चार पैसे मिळत असले तर सरकारने निर्यातीवर बंधने न घालता व बाहेरील देशाचा कांदा आयात न करता येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
.......
कर्नाटक, आंध्र प्रदेश, या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पावसाळी कांद्याचे नुकसान झाले आहे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा बऱ्यापैकी विकला गेल्यामुळे व काही कांदा चाळीमध्ये खराब झाल्यामुळे कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. यापुढे देखील कांद्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. - पंढरीनाथ श्रीपती पोखरकर माडीवाले,  व्यापारी,  कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर  
..........
कान्हुर मेसाई : खरीप हंगामातील सर्वांत महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणाºया टोमॅटो पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. किरकोळ बाजारात किलोला १० ते २० रुपये  आणि क्रेटला शंभर ते दोनशे रुपये भाव मिळत आहे. 
जून महिन्यात मृग नक्षत्र सुरू होताच पुणे जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाला सुरुवात सुरुवात झाली होती. त्यामुळे जूनच्या मध्यवर्ती आणि अखेरीस अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात टोमॅटो पिकांची लागवड केली होती. मशागत मल्चिंग पेपर रोप तार बांबू याची एकरी किमान ७० ते ८० हजार रुपये खर्च करून शेतात उभ्या केलेल्या पिकाला जुलै महिन्यात झालेल्या पावसाचा फटका बसला. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पाऊस पडल्याने या दोन महिन्यात बुरशी, फळ, ग्लुकोज, डंपिंग, करपा, व्हायरस अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. या काळात हजारो रुपयांची औषध फवारणी शेतकºयांना करावी लागली होती. असे असतानाही शेतकºयांची हाती आलेली पिके वाया गेली. याचा फटका टोमॅटो उत्पादकांनाही बसला.
 टोमॅटो पीक असलेल्या बहुतांशी भागात जास्त प्रमाणात पाऊस पडला असल्याने बाजारभाव चांगला मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. हंगामाच्या सुरवातीला चारशे ते पाचशे रुपये क्रेटला भाव मिळाला होता. मात्र, पंधरा ते वीस दिवसांत बाजार भाव कोसळले. शुक्रवारी क्रेटचा भाव शंभर ते दोनशे रुपये भाव झाला. तर किलोला १० ते २० रुपये किलो मिळत आहे. 
..........
कांद्याला उच्चांकी दर...
आळेफाटा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारच्या आठवडे बाजारात  कांद्याच्या दराने उसळी घेतली. कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ५ हजार १00 रुपये असा उच्चांकी दर मिळाला.   कांद्याच्या चांगल्या आवकेसाठी प्रसिद्ध असलेल्या आळेफाटा उपबाजारात गेल्या काही आठवडे बाजारातील दरात वाढ होत आहे. शुक्रवारच्या आठवडे बाजारात दराने प्रतिक्विंटल पाच हजार रूपयांचा टप्पा पार केला. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधान पसरले आहे.  शुक्रवारच्या आठवडे बाजारात जवळपास चौदा हजार कांदा गोणी विक्रीस आल्या असल्याचे सभापती संजय काळे, दिलीप डुंबरे यांनी सांगितले. 

Web Title: Onion is precious; Tomato prizes is decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.