कांद्याच्या भावात घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:13+5:302021-04-02T04:10:13+5:30
मंचर:कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गुरुवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस ११० ...
मंचर:कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गुरुवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस ११० ते १२२ रुपये असा भाव मिळाल्याची माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. बाजार समितीत २५ व्यापारी कांद्याची विक्री करतात, तर १३ खरेदीदारामार्फत कांद्याची खरेदी होऊन तो देशभरात पाठवला जातो. सध्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा व काही प्रमाणात कर्नाटक राज्यात कांद्याची निर्यात केली जात आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात एक नंबर गोळा कांदा दहा किलोस ११० ते १२२ रुपये, दोन नंबर कांदा ८० ते १२० रुपये, गोल्टी कांदा ४० ते ७० रुपये, तर बदला कांदा १० ते ४० रुपये या भावाने विकला गेला आहे. बाजार समितीत ६ हजार पिशवी कांद्याची आवक झाली होती.
अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यात फसवणूक झाली आहे. त्यामुळे कमी प्रतीचा कांदा उत्पादन निघत आहे. हा कमी प्रतीचा कांदा विक्रीसाठी येत असल्याने बाजारभाव कमी होऊ लागले आहेत. शेतकरी चांगला कांदा बाजारभाव वाढतील या आशेने बराकीत साठवून ठेवत आहे. तर कमी प्रतीचा कांदा काढणीनंतर लगेच बाजारात विक्रीसाठी आणला जातोय. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्राहकांकडून कांद्याला कमी उठाव आहे. मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी मिळत असल्याचे व्यापारी बाळासाहेब बाणखेले यांनी सांगितले.
०१ मंचर
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याचे लिलाव पार पडले.