कांद्याच्या दरात मोठी घसरण, अपरिपक्व कांदा बाजारात, आवक वाढल्याने किलोमागे ८ ते १० रुपयांनी दर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:59 AM2017-12-02T03:59:29+5:302017-12-02T03:59:44+5:30
केंद्र शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणामुळे दर पडण्याची भीती व ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला.
पुणे : केंद्र शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणामुळे दर पडण्याची भीती व ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळव्या कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले.
यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागात परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे नवीन हळव्या कांद्याची आवक कमी झाली होती, तर जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच पुणे बाजार समितीती कांद्याला उच्चांकी म्हणजे ३०० ते ४०० रुपये दहा किलोला दर मिळाले. कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र व पुण्यात इजिप्तचा कांदा आलादेखील. परंतु सामान्य ग्राहकांकडून त्याला फारसा उठाव मिळाला नाही. यामुळे परदेशातून कांदा आयात करूनदेखील दरामध्ये फार फरक पडला नाही.
परंतु मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भविष्यात कांद्याचे दर कोसळण्याची भीती शेतकºयांमध्ये आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस झाल्यास हाताशी आलेले कांद्याचे पिक पुन्हा खराब होईल, या धास्तीमुळे शेतकºयांनी नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरू होण्यास १५ ते २० दिवस शिल्लक असताना कच्चाच कांदा बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर विभागातून व श्रीगोंदा परिसरातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली.
हंगामातील उच्चांकी आवक
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी होती. त्यात नवीन कांद्याचा नवीन हंगाम सुरू झाला नसल्याने व जुन्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर दहा किलोमागे ३०० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. यामुळे चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी कच्चा कांदाच मोठ्या प्रमाणात बाजारात आणला आहे. यामुळे शुक्रवारी यंदाच्या हंगामातील कांद्याची उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्याने व कांदा कच्चा असल्याने दर कमी झाले.
- विलास भुजबळ,
पुणे मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष
दराच्या अपेक्षेने कोवळा कांदा बाजारात
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस झाल्याने नगर, नाशिक, पुण्यासह बीड जिल्ह्यातदेखील कांद्याची मोठ्या प्रमाणात लावगड करण्यात आली. नगर, बीड भागातील हळवी कांदा लवकर खराब होतो व मोड येतात. त्यामुळे येथील शेतकरी कांदा साठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यात कांद्याला सध्या चांगले दर मिळत असल्याने या परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कोवळा कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला वजनदेखील चांगले असते, यामुळे कांद्याची आवक वाढून दर कमी झाले.
- सूर्यकांत थोरात, कांदा व्यापारी
शुक्रवारी मार्केट यार्डमध्ये नवीन हळव्या कांद्याचे
२०० ते २२०
ट्रक आणि जुन्या कांद्याचे १५ ते
२० ट्रक आवक झाली. आवक वाढल्याने दरामध्येदेखील मोठी
घट झाली. सर्वसाधारण कांद्याला
२७० ते २८०
दर देण्यात आले.
तर संगमनेर विभागातील कांद्याला
२२० ते २८०
श्रींगोदा परिसरातील कांद्याला
१५० ते २५०
रुपये दहा किलो
आणि जुन्या कांद्याला
३०० ते ३६०
रुपये दहा किलो दर देण्यात आला.