पुण्यात कांद्याची आवक दीडपट वाढली, कांद्याच्या भावात किलोमागे २ रुपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:53 AM2017-09-18T05:53:40+5:302017-09-18T05:53:44+5:30
इजिप्तमधून कांद्याची आयात, नाशिकला व्यापा-यांवर प्राप्तीकर विभागाने टाकलेले छापे तसेच भाव घसरण्याच्या धास्तीने येथील बाजार समितीत तीन-चार दिवसांपासून आवक दीडपटीने वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दोन दिवसांत कांद्याच्या भावात किलोमागे २ रुपयांनी घसरण झाली.
पुणे : इजिप्तमधून कांद्याची आयात, नाशिकला व्यापा-यांवर प्राप्तीकर विभागाने टाकलेले छापे तसेच भाव घसरण्याच्या धास्तीने येथील बाजार समितीत तीन-चार दिवसांपासून आवक दीडपटीने वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दोन दिवसांत कांद्याच्या भावात किलोमागे २ रुपयांनी घसरण झाली.
कांद्याला घाऊक बाजारात किलोमागे १२ ते १५ रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली़ किरकोळ बाजारात मात्र चढ्या दरानेच कांद्याची विक्री होत आहे़ महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात कांद्याचे भाव २५ ते ३० रुपये किलोपर्यंत पोहचले होते. किरकोळ बाजारात दर ५० ते ६० रुपये होते.
आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यातून, तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातून शेतकरी कांदा घेऊन येत आहेत.