पुणेकरांच्या डोळ्यात कांद्याने आणले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 08:07 PM2019-12-03T20:07:36+5:302019-12-03T20:37:56+5:30
तब्बल १३० ते १५० रुपये किलो उच्चांकी दर
पुणे : दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाचा प्रचंड मोठा फटका कांदा पिकाला बसला आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवार (दि.३) रोजी पुण्यात किरकोळ बाजारात कांदा तब्बल १३० ते १५० रुपये किलो असे उच्चांकी दराने विकला गेला. शासनाने परदेशातून कांदा आयात करुन देखील कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यास अपयश आले आहे.
गुलटेकडी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा-बटाटा विभागात मंगळवार (दि.३) रोडी जुना व नवीन कांद्याच्या मिळून केवळ ३० ते ४० गाड्यांची आवक झाली. नवीन कांद्याचा हंगाम सुरु झाला असला तरी अवकाळी पावसाचा मोठा परिणाम नवीन कांद्यावर झाला आहे. सध्या मागणीच्या तुलनेत मार्केट मध्ये दाखल होणारी कांद्याची आवक खूपच कमी आहे. यामुळे घाऊन बाजारात दहा किलो जुन्या कांद्याला १३०० रुपये असा दर मिळाला. तर नवीन कांद्याला १ हजार रुपये किलोच दर फुटला. नवीन कांदा आणि जुन्या कांद्याची आवक पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून झाली आहे. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असला तरी कांद्याचा दर्जा तितकासा चांगला नाही. मात्र, कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत अपुरी पडत असल्याने नवीन कांद्याचे दर तेजीत आहेत़
--
जुन्या कांद्याचा हंगाम संपत आल्याने परिणाम
जुन्या कांदाच्या हंगाम संपत आला आहे. नवीन कांद्याच्या तुलनेत जुन्या कांद्याची प्रतवारी चांगली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात कांद्याचे दर तेजीत आहे. नवीन कांद्याची आवक साधारपणपणे दीड महिना सुरु राहिल. त्यानंतर पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात जुन्या कांद्यााचा हंगाम सुरु होईल. सद्यस्थितीत जुन्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे मात्र तुलनेने आवक कमी होत आहे. त्यामुळे मागणी वाढली असून कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे़
- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी