शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कांदे वाटले ८० पैसे किलोने !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:12 PM2019-12-12T17:12:45+5:302019-12-12T17:25:34+5:30
पवारप्रेमी कार्यकर्त्याने ४०० किलो कांद्याचे वाटप केले आहे. एकीकडे कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना हे कांद्याचे वाटप आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे ठरले.
पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आज वाढदिवस. राजकारणात मुरब्बी नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या पवार यांचे कार्यकर्ते आणि चाहते जगभर पसरले आहेत. असाच प्रसंग पुण्यात बघायला मिळाला असून पवारप्रेमी कार्यकर्त्याने ४०० किलो कांद्याचे वाटप केले आहे. एकीकडे कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना हे कांद्याचे वाटप आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे ठरले.
गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ओल्या दुष्काळाने घातलेले उत्पादन याला कारणीभूत असून सामान्यांना कांद्याच्या किमती परवडेनाशा झाल्या आहे. अशावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीमंत जगताप यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ४०० किलो कांदे वाटले. हा कांदा घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती. रांगा लावून कांदे विकत घेण्यात आले.
याबाबत जगताप म्हणाले, 'देशाचे कृषिमंत्री असताना अन्न धान्याचा तुटवडा कधीच नव्हता. पूर्वी कांदा रस्त्यावर फेकून दयायची वेळ आली होती. आज तोच कांदा लोकांना रडवत आहे. याचाच अर्थ शासकीय यंत्रणेत नियोजनाचा अभाव आहे. पवार यांच्या काळात असे कधीही झाले नव्हते. हेच लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले'.