बंगळुरूतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक; मार्केट यार्ड भागातील एकाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:56 PM2024-11-29T15:56:58+5:302024-11-29T15:56:58+5:30

 

Onion trader in Bangalore defrauded of Rs 5 lakh; Offense against one in Market Yard area | बंगळुरूतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक; मार्केट यार्ड भागातील एकाविरुद्ध गुन्हा

बंगळुरूतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक; मार्केट यार्ड भागातील एकाविरुद्ध गुन्हा

पुणे : बंगळुरूतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. कांदा व्यापाऱ्याने पैसे दिल्यानंतर त्याला कांदा पाठवला नाही. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी धनंजय खुशालचंद बोरा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत शशिकुमार टी. वैद्यलिंगम पिल्लई (४६, रा. रवींद्रनगर, बंगळुरू, कर्नाटक) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शशिकुमार बंगळुरूमधील कांदा व्यापारी आहेत. त्यांनी पुण्यातील मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातून कांदा खरेदीसाठी बोरा याच्याशी संपर्क साधला होता. बोरा याने मार्केट यार्डात त्याचे गाळे असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानंतर शशिकुमार यांनी त्याच्याकडून २५ टन कांदा खरेदीचा व्यवहार केला. त्यापोटी त्याला पाच लाख रुपये पाठवले.

२ नोव्हेंबर राेजी ट्रकमधून कांदा बंगळुरूतील पाठवल्याचे बोराने त्यांना सांगितले. कांदा न पोहोचल्याने त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा ट्रकमध्ये बिघाड झाल्याचे सांगून बोराने त्यांना ट्रक मालकाच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले. शशिकुमार यांनी दहा हजार रुपये पाठवले. मात्र, कांदा बंगळुरूत पोहोचला नाही. त्यानंतर त्यांनी बोरा याच्याशी संपर्क साधला. तेव्हा बोराने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात येत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Onion trader in Bangalore defrauded of Rs 5 lakh; Offense against one in Market Yard area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.