कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:38+5:302021-04-09T04:10:38+5:30
चाकण : नवीन गरवी कांद्याचा (उन्हाळी कांदा) हंगाम सुरू झाला असून चाकण बाजारात गरवी कांद्याची मोठी आवक होत आहे. ...
चाकण : नवीन गरवी कांद्याचा (उन्हाळी कांदा) हंगाम सुरू झाला असून चाकण बाजारात गरवी कांद्याची मोठी आवक होत आहे. आवक वाढल्याने घाऊक बाजारात एक किलो कांद्याला दहा ते आठ रुपये असा दर मिळत आहे.त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.तर निर्यातीत अधिकचा फायदा होत नसल्याने व्यापारी व कंपन्यांनीही निर्यात कमी प्रमाणात सुरू ठेवली आहे.
मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याची कमतरता भासणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली आहे.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या उपबाजारात उन्हाळी गरवा जातीच्या कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे.घाऊक बाजारभावात प्रतवारीनुसार कांद्याला आठ ते दहा रुपये किलो बाजारभाव मिळत आहे.मात्र किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री वीस ते पंचवीस रुपये दराने केली जात आहे.
कांद्याची निर्यात कमी होत असल्याने तसेच इतर राज्यातील कांदा राज्यातील बाजारात विक्रीसाठी येत आहे.त्यात कोरोनाचा वाढता प्रकोपाने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत.यामुळे कांद्याचे भाव गडगडले आहेत.
मागील दोन वर्षांतील सर्वांत नीचांकी हे भाव आहेत.असल्याचे शेतकरी व व्यापऱ्यांनी सांगितले.दोन महिन्यांपूर्वी घाऊक कांद्याला बाजारात चाळीस भाव मिळत होता.मात्र मार्च महिन्यात कांद्याचे भाव कोसळण्यास सुरुवात झाली ती आजपर्यंत कायम राहिली आहे.
कर्नाटक, मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश, गुजरात व राजस्थानसह इतर राज्यांमध्येही पाण्याची मुबलकता असल्याने तेथील शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील चाकण, नाशिक येथील कांद्याची देशांतर्गत मागणी काही प्रमाणात कमी झाल्याने भाव घटले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
कांद्याला प्रतवारीनुसार आठ ते दहा रुपये किलो बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. शेतकरी कोलमडून पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्य शासनाने यावर काही तरी निर्णय घ्यावा.
विनायक घुमटकर,सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड.
०८ चाकण
चाकण बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा.