सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्जास सुरुवात; कसा करायचा अर्ज?
By प्रशांत बिडवे | Published: July 28, 2023 06:33 PM2023-07-28T18:33:16+5:302023-07-28T18:33:46+5:30
विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ येत्या सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या पदवी प्रदान समारंभासाठी अर्ज प्रक्रियेस १ ऑगस्टपासून सुरुवात हाेणार आहे. विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागातर्फे करण्यात आले आहे.
ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ आणि जून / जुलै २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. दि. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नियमित शुल्क भरून तर १ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.