आॅनलाइन आकर्षणांचा भुलभुलैया
By admin | Published: October 21, 2016 04:52 AM2016-10-21T04:52:57+5:302016-10-21T04:52:57+5:30
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज होणारे ‘अपडेट आणि अपग्रेड्स’चा वापर जसा चांगल्या कामांसाठी केला जातो तसाच तो वाईट कामांसाठीही केला जात असल्याचे अनेकदा समोर
पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज होणारे ‘अपडेट आणि अपग्रेड्स’चा वापर जसा चांगल्या कामांसाठी केला जातो तसाच तो वाईट कामांसाठीही केला जात असल्याचे अनेकदा समोर आहे आहे. गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि सोशल मीडियावर आकर्षक जाहिरातींद्वारे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. सुशिक्षितांकडून सुशिक्षितांना गंडवले जात आहे. बिनचेहऱ्याचे हे चोरटे अनेकांची खाती रात्रीमधून रिकामी करीत आहेत.
या गोरख धंद्यामध्ये नायजेरियन फ्रॉडचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहेत. यासोबतच दिल्लीमधील कॉल सेंटर्स मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.
पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गेल्या दहा महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईत दिल्लीतील तब्बल नऊ टोळ्या गजाआड केल्या आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या नागरिकांच्या खात्यांमधून रातोरात लाखो रुपये लंपास करण्याच्या घटना आगामी काळातही मोठ््या प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे. जनजागृतीचा अभाव, भूलथापांना बळी पडणे, माहितीची खातरजमा न करता विश्वास ठेवणे अशा कारणांमुळे आॅनलाइन पाक ीटमारी जोमात आहे.(प्रतिनिधी)
डेबिट /क्रेडिट कार्ड फ्रॉड
एखाद्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि एखाद्या बॅँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती विचारली जाते. एटीएम आणि डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून खात्याची माहिती घेतली जाते. पुढच्या काही मिनिटांत तुमचे कार्ड पुन्हा सुरू होईल, असे सांगून फोन बंद केला जातो. काही वेळांतच आपल्या खात्यातून हजारो रुपये लंपास झाल्याची माहिती मिळते आणि आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते. हा अनुभव गेल्या काही महिन्यांपासून पुणेकर घेत आहेत. खोट्या फोन कॉल्सद्वारे अनेकांची बचत खाती रिकामी करण्यात आल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
ई-मेल आणि फोन कॉल्स अथवा मेसेज पाठवून अशा प्रकारची फसवणूक केली जात आहे. विविध बँकांच्या खातेदारांना मोबाईलद्वारे संपर्क साधला जातो. आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचा अथवा राष्ट्रीय बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगितले जाते. तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे. ते तुम्ही आता वापरू शकणार नाही, अशा प्रकारे भीती दाखवली जाते.
गोड गोड बोलून डेबिट अथवा क्रेडिट कार्डवर असलेला १६ आकडी क्रमांक विचारून घेतला जातो. त्यानंतर कार्डाची ‘व्हॅलिडिटी’ विचारली जाते. कार्डाच्या पाठीमागे असलेला सीव्हीव्ही क्रमांक विचारून घेतला जातो. ही माहिती विचारून घेतल्यानंतर कार्डाचा पिन क्रमांक विचारला जातो. मूळ पिन क्रमांक बदललेला असून, नवीन पिन क्रमांकाचा मेसेज काही वेळांतच तुम्हाला मिळेल, अशी थाप मारली जाते.
पिन बदलल्याच्या मेसेजची वाट पाहत बसलेल्या खातेधारकाच्या खात्यामधून असतील तेवढी रक्कम काही क्षणांतच लंपास केलेली असते. पुण्यामध्ये गेल्या दहा महिन्यांत अशा प्रकारे नागरिकांना तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण यात अधिक आहे.
इन्श्युरन्स फ्रॉड ..
विविध विमा कंपन्यांच्या नावे ग्राहकांना फोन केले जातात. त्यांच्या चालू अथवा पूर्ण होत आलेल्या पॉलिसींचे पैसे, तसेच त्यासोबतच आणखी जास्ती रकमेचे पॅकेज देण्याचे आमिष दाखवले जाते. त्याबदल्यात ग्राहकांना दिलेल्या बॅँक खात्यावर पैसे भरायला लावले जातात. लाखो रुपये भरल्यानंतरही ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते तेव्हा बराच उशीर झालेला.
त्यासाठी विविध विमा कंपन्यांकडून ग्राहकांचा डाटा घेतला जातो. यासोबतच विमा कंपन्यांच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या ग्राहकांचीही माहिती मिळवली जाते. या ग्राहकांशी ई-मेल अथवा मोबाईलद्वारे संपर्क साधला जातो. त्यांना ज्यादा परताव्याचे आकर्षण दाखवले जाते.
काय घ्याल काळजी?
- आपला डेबिट/क्रेडिट कार्डाचा क्रमांक कोणालाही देऊ नका
- कोणतीही बॅँक फोनद्वारे आपल्याकडे माहिती मागत नाही
- फसवा फोन आल्यास तत्काळ पोलीस अथवा बॅँकेशी संपर्क साधा
- आपल्या बँक खात्यांची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका