फटाका स्टॉलचा ऑनलाइन लिलाव; पुणे महापालिकेचा नवा फंडा, २६ लाख उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:59 AM2023-10-31T09:59:44+5:302023-10-31T10:00:49+5:30
काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी दादागिरी मोडीत निघाली
पुणे: पुणे महापालिकेने यंदा प्रथमच फटाके विक्रीसाठी ऑनलाइन लिलाव सुरू केला आहे. शनिवार पेठेतील वर्तक बाग येथील ३५ गाळ्यांपैकी १५ गाळ्यांच्या लिलावातून २६ लाख २३ हजार १७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी ३५ गाळ्यांमधून फक्त १४ लाख ६६ हजार रुपये मिळाले होते. त्यामुळे नेते आणि कार्यकत्यांची दादागिरी मोडीत निघाली आहे.
महापालिकेतर्फे दिवाळीमध्ये फटाके विक्रीसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा व्यावसायिकांना भाड्याने दिल्या जातात. गेली अनेक वर्षे ऑफलाइन लिलाव केले जात आहेत. त्यामुळे ठराविक व्यावसायिकांनाच तेथे व्यवसाय करता येत होता, नवीन व्यावसायिकांना संधी मिळत नव्हती. गेल्यावर्षी शनिवार पेठेतील वर्तक बागेतील ३५ गाळ्यांचा लिलाव करताना कसबा विधानसभा मतदारसंघातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी दादागिरी केली. त्यामुळे अनेकांना बोली न लावताच स्पर्धेतून बाहेर जावे लागले. या लिलावात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या. येथे योग्य स्पर्धा न झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांनी व संबंधित व्यावसायिकांनी अवघ्या २५ हजारांत स्टॉल घेतले. काहींनी तेथे पोटभाडेकरू ठेवून त्यांच्याकडून जास्त पैसे उकळले होते. त्यामुळे महापालिकेने पुढाऱ्यांचा विरोध झुगारून यंदा फटाके विक्रीच्या गाळ्यांसाठी ऑनलाइन बोली लावण्याचा निर्णय घेतला. १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १६५ गाळे त्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. वर्तक बागेच्या ३५ गाळ्यांसाठी हा लिलाव सुरू झाला. काल सायंकाळी ७ पर्यंत १५ गाळ्यांचा लिलाव पूर्ण झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत सात ते आठ पट जास्त रक्कम देऊन व्यावसायिकांनी जागा भाड्याने घेतली आहे. उर्वरित २२ गाळ्यांचा लिलाव राहिल्याने महापालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होणार आहे.