आॅनलाइन बुकिंगचा प्रस्ताव बासनात

By admin | Published: December 27, 2016 03:35 AM2016-12-27T03:35:20+5:302016-12-27T03:35:20+5:30

एकीकडे ‘डिजिटल इंडिया’चा नारा सत्ताधारी पक्षाकडून दिला जातोय. कॅशलेस व्यवहारांकडे देशाचा आर्थिक प्रवास सुरू झाला आहे. नेट बँकिंग, कार्डस्च्या वापराला अधिकाधिक

Online booking offer in Basan | आॅनलाइन बुकिंगचा प्रस्ताव बासनात

आॅनलाइन बुकिंगचा प्रस्ताव बासनात

Next

- नम्रता फडणीस/प्रज्ञा केळकर-सिंग, पुणे

एकीकडे ‘डिजिटल इंडिया’चा नारा सत्ताधारी पक्षाकडून दिला जातोय. कॅशलेस व्यवहारांकडे देशाचा आर्थिक प्रवास सुरू झाला आहे. नेट बँकिंग, कार्डस्च्या वापराला अधिकाधिक चालना देण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु हा बदल स्वीकारण्यास समाजातील काही घटकांची जशी मानसिकता नाही तसे नाट्य क्षेत्रदेखील आपली पारंपरिक चौकट मोडण्यास अद्याप तयार
नाही.
त्यामुळेच महापालिका प्रशासनाने नाट्यगृहांचे ‘आॅनलाइन’ पद्धतीने बुकिंग करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची
इच्छा प्रदर्शित केली असूनही,
नाट्य-लावणी निर्माता, कलाकार आणि संयोजकांनी विरोध
दर्शविलेला आहे. त्यामुळे हा चांगला प्रस्ताव बासनात गुंडाळण्याची वेळ आली आहे.
सध्या महापालिकेच्या नाट्यगृहांचे चौमाही पद्धतीने वाटप केले जाते. नाट्य, लावणी निर्माते, सामाजिक संस्था यांना व्यवस्थापकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांच्या प्रयोगासाठी तारखा दिल्या जातात. समोरासमोर या तारखांचे वाटप करण्यात येत असल्यामुळे सर्वांना समान न्याय दिला जातो.
मात्र, नाट्यगृहांचे बुकिंग ‘आॅनलाइन’ पद्धतीने झाल्यास एकाच व्यक्तीकडून तारखा आरक्षित होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाट्य, लावणी निर्मात्यांना तारखाच मिळू शकणार नाहीत, असे झाल्यास नाट्यव्यवसाय अडचणीत येण्याची भीती नाट्य, लावणी
निर्माता आणि संयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दुसरीकडे नाट्यगृहांचे आॅनलाइन बुकिंग झाल्यास प्रशासनाचा निम्म्याहून अधिक भार हलका होणार आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी ऐनवेळी तारखा काढून टाकण्याच्या गोष्टींना काही प्रमाणात आळा बसेल, असे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.
यामधून आता नाट्यगृहांच्या आॅनलाइन बुकिंगमधून खासगी संस्थांना वगळणे आणि एका व्यक्तीला ठराविक कार्यक्रमांचे बुकिंग करता येणे अशा स्वरूपाच्या नियमावलीद्वारे सुवर्णमध्य काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

नाट्यगृहांच्या चौमाही वाटपामुळे कुणाला तारखा दिल्या आहेत, हे कळू शकते. हे आॅनलाइन झाल्यास हे कळले जवळपास दुरापास्तच होईल. एखाद्या हैदराबादमधील उद्योगपतीने १० लाख रुपये भरून तारखा बुक केल्या तर आम्ही काय करायचे? त्यामुळे आॅनलाइनला आमचा विरोध राहाणारच आहे. नाटकांची तिकीट विक्री आॅनलाइन जरूर करावी, पण नाट्यगृहांचे चौमाही वाटपच राहिले पाहिजे.
- सुनील महाजन

नाट्यगृहांचे आॅनलाइन बुकिंग झाले तर प्रशासनाचे नियंत्रण राहणार नाही. कुणीही कितीही तारखा बुक करू शकेल आणि नाट्य-लावणी निर्माते, संयोजक यांना तारखा मिळणार नाहीत. हे करायचे झाल्यास वेगळी यंत्रणा आणि नियमावली कार्यान्वित करावी लागेल. त्यामुळे नाट्यगृहांचे आॅनलाइन बुकिंग करण्यापेक्षा नाट्यगृहांची संपूर्ण माहिती (आसनक्षमता, लोकेशन) आॅनलाइन द्यावी.
- मोहन कुलकर्णी, नाट्य संयोजक

आॅनलाइन बुकिंगची प्रक्रिया राबविल्यावर ऐन वेळी कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत. लावण्यांचे कार्यक्रम ऐन वेळेला काही कारणांनी रद्द किंवा पुढे ढकलावा लागल्यास, आॅनलाइन बुकिंगमध्ये ती सोय नाही. या प्रक्रियेच्या माध्यमातून खासगी संस्थांना जास्त तारखा मिळाल्यास लावणी संघ, नाट्य निर्माता संघाची अडचण होऊ शकते. त्यामुळे आॅनलाइन बुकिंग प्रक्रियेला विरोध करण्यात आला आहे. मात्र, एका व्यक्तीला जास्त कार्यक्रमांचे बुकिंग करण्याची परवानगी नसणे, या प्रक्रियेतून खासगी संस्थांना वगळणे, अशा पर्यायांवर विचार सुरू आहे.
- मेघराज राजेभोसले,
अध्यक्ष लावणी निर्माता संघ

एखादी नाट्य संस्था चार महिन्यांचे आगाऊ बुकिंग करते. आॅनलाइन बुकिंग सुरू केल्यास या तारखांमध्ये बदल करणे अवघड असते. एखाद्या कार्यक्रमाचे बुकिंग झाले तरी ऐनवेळी कलाकार उपलब्ध न झाल्यास अडचण होते. तारखांचे आगाऊ बुकिंग झाले तरी नाट्यसंस्था एकमेकांसमवेत चर्चा करून तारखा एकमेकांना देतात. प्रत्यक्षात, एखाद्या संस्थेचे दोन दिवस बुक करण्याची सोय आॅनलाइन सिस्टिममध्येही करता येऊ शकते. आॅक्टोबर महिन्यात यासंदर्भातील बैठक झाली होती. मात्र, कलाकार आणि नाट्य संस्थांकडून त्याला विरोध करण्यात येत आहे. विरोध केल्यानंतर यासंदर्भात एकानेही विचारणा केली नाही. या प्रक्रियेमुळे एखाद्या राजकीय कार्यक्रमासाठी दुसरा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता कमी होऊ शकते. सर्व प्रक्रिया आॅनलाइन होत असल्याने अचानक कार्यक्रम रद्द करणे शक्य होणार नाही.
- भारत कुमावत, नाट्यगृह व्यवस्थापक

Web Title: Online booking offer in Basan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.