‘ऑनलाइन’मुळे विद्यार्थ्यांच्या मेंदूची पाटी कोरीच; बहुतांश बनले ‘कॉपीबहाद्दर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:51+5:302021-03-31T04:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वर्षभरातील ‘व्हर्च्युअल क्लासरूम’मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असले तरी विद्यार्थांच्या मेंदूची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वर्षभरातील ‘व्हर्च्युअल क्लासरूम’मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असले तरी विद्यार्थांच्या मेंदूची पाटी कोरीच राहिली आहे. सीबीएससी शाळांंमधील बहुतांश विद्यार्थ्यांना विषयाचे आकलनच योग्यप्रकारे न झाल्याने वार्षिक परीक्षेचे पेपर बहुतेकांनी ‘कॉपी’ करूनच सोडविले असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
यामुळे वर्षभराच्या ऑनलाइन शिक्षणाचा फायदा काय, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांची ही अवस्था तर दुसरीकडे एप्रिल-मेमध्येच सीबीएससी शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा होणार असल्याने शिक्षकदेखील वैतागले आहेत.
ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांमध्ये पाठदुखी, कंबरदुखीसह डोळ्यांचे आजार उद्भवले असून, शाळेने आखून दिलेले विशिष्ट तास भरून घेण्यासाठी शिक्षकांना दोन ते तीन तासाच्या कार्यशाळादेखील कराव्या लागत आहेत. शिक्षकांना कामातून थोडी देखील उसंत दिली जात नसल्याने शिक्षकांना बैलासारखे राबवून घेतले जात आहे. त्यामुळे आगामी वर्षात ‘ऑनलाईन शिक्षण नको रे बाबा’ असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षणाद्वारे ‘न्यू एज्युकेशन लाईफ’चा नारा दिला. परिणामी खासगी आणि अनुदानित व विनाअनुदानित मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांनी ऑनलाईन तासिका सुरू केल्या. मात्र तासिकांना विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, एकाच ठिकाणी बराच वेळ विद्यार्थ्यांमध्ये बसण्याच्या संयमाचा अभाव, तासिकांना ‘व्हिडिओ म्यूट’ करून ‘गेम्स’ खेळत बसणे अशा प्रकारांमुळे विषयांचे योग्य आकलन विद्यार्थ्यांना होऊ शकलेले नाही. वर्षभराचे शालेय शुल्क, इंटरनेटचा खर्च असा भुर्दंड सोसूनही पालकांच्या पदरी अपयशच पडले आहे.
‘व्हर्च्युअल क्लासरूम’चा विद्यार्थ्यांना फायदाच होत नसेल तर या शिक्षणाचा उपयोग काय? याकरिता शाळांनी वेगळा पर्याय शोधून काढायची गरज आहे, याकडे पालक दीप्ती गोडबोले यांनी लक्ष वेधले आहे. मुलांना विषयाचे आकलन झालेले नसेल तर मग शुल्क भरून नाहक भुर्दंड आम्ही सोसायचा का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोट
“आम्हीच मुलांना प्रश्न आणि उत्तर पाठवतो आणि त्यावर आधारितच प्रश्नपत्रिका काढतो. मात्र उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाल्याचे पाहायला मिळाले. हे ‘कॉपी’ शिवाय नक्कीच शक्य नाही हे आम्हाला देखील माहीत आहे. पेपर सोडवताना विद्यार्थी अचानक ‘व्हिडिओ स्टॉप’ करतात. व्हर्चुअल परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणेही शक्य होत नाही. यातच आम्हाला पाऊण तासाचा वर्ग घेण्यास सांगितलेले असते. त्यावेळेत आम्हाला अभ्यासक्रम संपवायचा असतो. मग मुलांच्या प्रश्नांना उत्तरे कशी देणार? गेले वर्षभर शिक्षकांना राबवून घेतले जात आहे. त्यामुळे कंबरदुखी, डोळे दुखणे असे आजार देखील जडले आहेत. पण आम्ही सांगणार तरी कुणाला? आम्ही स्वत: या ऑनलाइन शिक्षणाला खूप वैतागलो आहोत.”
- नंदिता जाधव, शिक्षिका
कोट
शासनाचे चुकीचे धोरण
“ऑलाइन शिक्षणापेक्षा प्रत्येक विषयाच्या ऑफलाईन स्वाध्याय पुस्तिका निर्माण करायला हव्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत सोडवून घेणे अपेक्षित होते. मात्र इंग्रजी शाळांशी तुलना करून शासनाने ऑनलाईन शिक्षण पद्धत आणली. आजही कितीतरी मराठी शाळांमधील मुलांकडे शिक्षणाची साधने नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानच झालेले आहे. मग इंग्रजी शाळांशी तुलना कशी केली जाऊ शकते? त्यांच्याबरोबरची स्पर्धा आणि अनुकरण यातून हे पाऊल उचलण्यात आले. दहा टक्के मुले जर शिक्षणापासून वंचित राहात असतील तर त्या शिक्षणाचा काय अर्थ? शासनाने आगामी शैक्षणिक वर्षात पहिले दोन महिने विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. त्या महिन्यात शासनाने स्वाध्याय पुस्तिका छापाव्यात. शिक्षणाचे विक्रेंद्रीकरण झाले पाहिजे.”
- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ