मुंढे यांना पाठिंब्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीम

By admin | Published: April 10, 2017 02:51 AM2017-04-10T02:51:20+5:302017-04-10T02:51:20+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त

Online campaign for Munde supporting Mundhe | मुंढे यांना पाठिंब्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीम

मुंढे यांना पाठिंब्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीम

Next

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे काही कर्मचारी संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पीएमपी प्रवासी मंचाने मुंढे यांच्या या निर्णयांना पाठिंबा दिला असून त्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीमही सुरू केली आहे.
मुंढे यांनी पहिल्या दिवसापासून पीएमपीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच मार्गावर अधिकाधिक बस आणण्यासाठीही संंबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत कामाला लावले आहे. कामात हलगर्जीपणा करणे, कामाच्या वेळी झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत बदल्याही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. सुट्टे भाग वेळेवर न दिल्याने भांडार व्यवस्थापकांनाही निलंबित केले आहे. पीएमपीच्या कार्यालयीने वेळेतही बदल करण्यात आला असून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर काही कर्मचारी संघटनांनी मुंढे बेकायदेशीरपणे कर्मचाऱ्यांचे निलंबन करीत असल्याचा दावा केला आहे.
पीएमपी प्रवासी मंचाने मात्र मुंढे यांच्या या कारवाईला पाठिंबा दर्शविला आहे. मुंढे हे कार्यक्षम अधिकारी असून, संस्थेला शिस्त लावण्यासाठी ते जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा असेल, असे मंचाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, मुंढे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिस्त घालून दिली आहे. कामाच्या वेळात वाढ केली. कामातील हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या निर्णयामुळे काही कर्मचारी नाराज झाले आहेत. त्यामुळे मुंढे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, मुंढे पीएमपी व प्रवासीहिताचे निर्णय घेत असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या सह्या पोहचविल्या जाणार आहेत.
(प्रतिनिधी)

याला पाठिंंबा नाही
मुंढे यांनी प्रवासीकेंद्री निर्णय घेतल्यास त्याला पूर्णपणे समर्थन आहे. पण काही दिवसांपूर्वीच तोट्यातील काही मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय चुकीचा असून, त्याला मंचाचा पाठिंबा असणार नाही. सर्व निर्णय प्रवासीहिताचेच व्हायला हवेत. मार्ग बंद करणे हा पर्याय नसून त्यात प्रवाशांचीही चुक नाही, असे जुगल राठी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Online campaign for Munde supporting Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.