शहरातील जैवविविधतेचे ऑनलाइन संकलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:19 AM2019-01-09T01:19:42+5:302019-01-09T01:20:10+5:30
इंद्रधनुष्य केंद्राचा उपक्रम : अभ्यासक, संशोधकांचा सहभाग घेणार
पुणे : शहरातील जैवविविधतेची माहिती एकत्र व्हावी आणि ती संशोधक, अभ्यासक, विद्यार्थ्यांना अभ्यासता यावी यासाठी पुणे महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रातर्फे आॅनलाइन माहिती संकलित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये केंद्राकडे असलेली माहिती टाकण्यात आली असून, नागरिकांनाही त्यामध्ये त्यांच्याकडील फ्लोरा आणि फ्युनाची माहिती देता येणार आहे.
पुणे शहरात प्रचंड प्रमाणावर जैवविविधता आहे. परंतु, त्याची एकत्रित अशी कुठेही माहिती नाही. यापूर्वी काही संशोधकांनी त्यासाठी प्रयत्न केला, परंतु, ते जमले नाही. म्हणून इंद्रधुनष्य केंद्रातर्फे जैवविविधतेची माहिती संकलित करण्यात येत आहे. याबाबत याबाबत महापालिका पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘‘सध्या त्यासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे. त्याचे उद्घाटन जैवविविधता समितीचे अध्यक्ष किरण दगडे पाटील यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वीच झाले. त्यावर केंद्राकडील फ्लोरा आणि फ्युनाची माहिती टाकण्यात आली आहे. त्यात पक्षी, वनस्पती, मासे, वृक्ष, फुलपाखरू आदी फ्लोरा आणि फ्युनाचे स्थानिक नाव, वैज्ञानिक नाव, त्याचा प्रकार देण्यात आला आहे. फ्लोरामध्ये ७९६ नावे, तर फ्युना विभागात ४४२ नावांचा समावेश आहे.
या माहितीमध्ये आता नागरिक त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती टाकू शकतात. त्यासाठी त्यांना नोंदणी करावी लागेल. नोंदणी करून फ्लोरा आणि फ्युनाची माहिती भरावी लागेल. ही सर्व एकत्रित माहिती आम्ही सर्वांसाठी खुली करणार आहोत. त्यामुळे पुण्याची जैवविविधता संपन्न असल्याचे समोर येईल. ते जपण्यासाठी प्रयत्न करता येतील.’’
महाविद्यालयांना पत्राद्वारे आवाहन
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इंद्रधनुष्य केंद्रातर्फे महाविद्यालयांना पत्र लिहिण्यात येणार आहे. कारण, महाविद्यालयात जैवविविधतेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक असतात. त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
नोंदवही ऐवजी संकेतस्थळाची निर्मिती
जैवविविधतेची नोंद करण्यासाठी गावामध्ये नोंदवही आहे. परंतु, शहरामध्ये तशी नोंदवही भरणे अशक्य आहे. परंतु, आॅनलाइन मात्र हे काम अतिशय वेगाने होऊ शकेल. म्हणून आम्ही संकेतस्थळ तयार केले आहे.