मृतदेह डब्यातच राहिल्याच्या ऑनलाईन तक्रारीवरून रेल्वेची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:26+5:302021-07-31T04:12:26+5:30
प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे सुटल्याने नाराज झालेल्या एका प्रवाशाने ऑनलाईन तक्रार करीत मी आणलेला मृतदेह ...
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे सुटल्याने नाराज झालेल्या एका प्रवाशाने ऑनलाईन तक्रार करीत मी आणलेला मृतदेह डब्यातच राहिला असल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाची भंबेरी उडवून दिली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की “माझे सामान डब्यातच राहिले व रेल्वे मला सोडून गेल्याने मी अशी खोटी तक्रार दिली“. मात्र अशी खोटी तक्रार देणे त्याला चांगलेच महागात पडले. कारण रेल्वे न्यायालयाने त्याला साडेतीन हजार रुपयांचा दंड व १० दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली. ही घटना गुरुवारी मांजरी स्थानकावर घडली.
गुरुवारी दुपारी पुणे-दरभंगा एक्स्प्रेसच्या ‘डी १’ या डब्यातून प्रवास करणाऱ्या अखिलेश कुमार या प्रवाशाचा मोबाईल खिडकीतून खाली पडला. त्याने डब्यांतील आपत्कालीन चैन ओढून रेल्वे थांबवली. त्यावेळी रेल्वे मांजरी स्थानकाच्या जवळ होती. अखिलेश कुमार मोबाईल घेण्यास खाली उतरला. तेवढ्यात गार्डने रेल्वे पुढे नेण्याची सूचना दिली. त्यानंतर रेल्वे पुढे निघाली. अखिलेश कुमार खालीच राहिला व त्याचे सामान डब्यातच राहिले. चिडलेल्या अखिलेशने मांजरी स्थानकावरूनच रेल्वेला धडा शिकविण्याच्या उद्देशाने ऑनलाईन तक्रार करीत दरभंगा रेल्वेत मी सोबत आणलेला मृतदेह तसाच राहिला असल्याचे सांगितले. ही तक्रार येताच रेल्वे प्रशासन देखील चक्रावले. त्याने सांगिलेल्या रेल्वेच्या डब्यात तपासणी करण्यात आले पण आरपीएफला कुठेही मृतदेह आढळला नाही. मग त्याच्याशी संपर्क साधून त्याला सांगण्यात आले की, ‘तुझे सामान आमच्याकडे आहे तेव्हा तू दौंड स्थानकावर येऊन घेऊन जा’. अखिलेश सामान घेण्यासाठी दौंड स्थानकावर आला तेव्हा त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मग त्याने सांगितले ‘मी केवळ सामान घेण्यासाठी व रेल्वेला धडा शिकविण्यासाठी अशी तक्रार दिली.’ चैन ओढून रेल्वे थांबविणे यासाठी आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन शुक्रवारी न्यायालयात नेले असता त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी व साडेतीन हजारांचा दंड करण्यात आला.