पालकांमध्ये कोरोनाबाबत ऑनलाइनद्वारे जनजागृती - सीएम इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम, डॉक्टरांनी केले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:57+5:302021-05-24T04:10:57+5:30
पुणे - कोरोनाचा लहान मुलांना असलेला धोका आणि त्याबद्दलची पालकांमधील काळजीवजा अस्वस्थता लक्षात घेऊन पुण्यातील सीएम इंटरनॅशनल या शाळेने ...
पुणे -
कोरोनाचा लहान मुलांना असलेला धोका आणि त्याबद्दलची पालकांमधील काळजीवजा अस्वस्थता लक्षात घेऊन पुण्यातील सीएम इंटरनॅशनल या शाळेने प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि पुण्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. संजय मानकर यांच्या खुल्या वेबिनार सत्राचे आयोजन पालकांसाठी केले होते. मुलांमध्ये या रोगाचे परिणाम कमी आहेत, त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असा विश्वासही मानकर यांनी दिला.
योग्य औषधोपचारांसोबत, योग्य ज्ञान हेच कोविड संकटात आपली शक्ती आहे. दुर्दैवाने मागील काळात केवळ योग्य माहितीच्या अभावी किंवा चुकीच्या माहितीमुळे लोकांनी प्राण गमावले आहेत. योग्य माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी हा उपक्रम घेतल्याचे शाळेचे ट्रस्टी डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांनी सांगितले.
डॉ. मानकर यांनी या खुल्या सत्रात पालकांच्या सर्व शंकांचे सोप्या भाषेत निरसन केले. मुलांना संसर्ग होण्याच्या केसेस समोर येत असल्या तरीही फक्त अपवादात्मक केसेस या गंभीर स्वरूपाच्या आहेत असे त्यांनी सांगितले. नवजात बालक ते १२ वर्षामधील मुलांना कोरोनाचा धोका हा किशोरवयीन मुलांच्या वयोगटातील मुलांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. कोरोनामुळे आणि या महामारीनंतर मुलांत होणाऱ्या एमआयएस किंवा कावसाकी या रोगपरिणामांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून न जाण्याचे आव्हान त्यांनी केले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापिका इक्बाल कौर राणा उपस्थित होत्या.