ऑनलाइन शिक्षण ठराविक 'क्लास' पुरतेच.. वंचित घटकातील मुले शिक्षणापासून ' वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 07:19 AM2020-06-30T07:19:16+5:302020-06-30T07:20:02+5:30
हातावरचे पोट असलेल्या सामान्यांची जिथं एक दिवसाच्या जेवणाची भ्रांत असताना ते स्मार्टफोन आणणार तरी कुठून? अशी स्थिती आहे.
नम्रता फडणीस
पुणे : शिक्षणाची गंगाजळी सर्वदूर पोहोचविणे हे शासन उद्दिष्ट्य असताना कोरोनामुळे लादलेल्या ऑनलाइनशिक्षणाबाबतचे चित्र मात्र नेमके उलटे पाहायला मिळत आहे. हातावरचे पोट असलेल्या सामान्यांची जिथं एक दिवसाच्या जेवणाची भ्रांत असताना ते स्मार्टफोन आणणार तरी कुठून? अशी स्थिती आहे. लॅपटॉप तर सोडाच केवळ स्मार्ट फोन हाताशी नसणे आणि जरी कुठून तरी असे फोन मिळवलेच तरी त्या फोन मध्ये इंटरनेट रिचार्ज करण्याचीही ऐपत नसल्याने अनेक वंचित मुलांचे शिक्षण थांबले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण केवळ ठराविक 'क्लास' पुरतेच आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षणाद्वारे ' न्यू एज्युकेशन' चा नारा दिल्यामुळे शहरातील खासगी आणि अनुदानित व विनाअनुदित मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग शासन आदेशानुसार सुरूही केले आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यापूर्वी दूरदर्शनवर शैक्षणिक चॅनेल सुरू केले जाईल असे शासनाने घोषित करून देखील ही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा भुर्दंड हा पालकांनाच बसला आहे. मात्र या सर्व ऑनलाइन शिक्षणाच्या गदारोळात वाड्या- वस्त्या, झोपडपट्टी मध्ये राहणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मात्र दुर्लक्षित राहिला आहे. या भागात राहणारे अधिकतर घरकामगार, विक्रेते या वर्गात मोडणारे आहेत.
लॉकडाऊनच्या तीन महिने काळात त्यांचे काम पूर्णत: ठप्प होते. त्यामुळे हाताशी पैसा नाही मग मुलांना ऑनलाइन शिक्षण कसे देणार? अशी चिंता या घटकाला भेडसावत आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज या गरीब आणि गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि शाळांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केली आहे.
.........
आमच्या शाळेचे इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले आहेत. या शाळेत अधिकांश झोपडपट्टी मधील मुले शिक्षण घेतात. सर्व मिळून 400 मुले आहेत. आम्ही केलेल्या पाहाणीनुसार जवळपास 100 मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही कुणाकडे जुने अँड्रॉईड फोन असतील तर ते आमच्या शाळेला द्यावेत असे आम्ही आवाहन केले आहे- वृषाली धोंगडे, मुख्याध्यापिका, नूतन बाल विकास मंदिर .... .
........................................
ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक मुलांचे शिक्षण संपून जाईल. खेडेगावात तर वीज देखील नाही. मग या मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे? ' आधुनिक' होणं ही चांगली गोष्ट आहे. पण आपली पूर्वतयारी झालेली नाही हे मान्य करावे लागेल. या पद्धतीने शिक्षण घेऊन उपयोग होणार नाही. एखादा अनुकरण करणारा शिक्षक हवा. तरच मुले शिकतील. स्मार्ट फोन ही विशिष्ट वगार्ची सोय आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापासून वंचित राहात आहेत- विलास चाफेकर, संस्थापक वंचित विकास संस्था
......
समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. यातच ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट रिचार्ज देखील पालक करू शकत नसल्यामुळे अनेक मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असे वाटते की एक वर्ष त्यांना शिक्षण देऊ शकलो नाही तर काय फरक पडणार आहे- दीपा कुलकर्णी, निरामय संस्था ......