बँकेतून बोलत असल्याचे सांगून ६३ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 08:40 PM2019-08-02T20:40:32+5:302019-08-02T20:41:36+5:30
बँक क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती विचारून एकाची ६३ हजारांची फसवणूक करण्यात आली.
पुणे : बँक क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती विचारून एकाची ६३ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोथरुड येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी घरी असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण बँक क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांना क्रेडिट कार्डची माहिती व ओटीपी क्रमांकाबद्दल विचारणा केली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या खात्यातून ३९ हजार ९९९ व २३ हजार असे दोन वेळा ट्रान्झॅक्शन करून एकूण ६२ हजार ९९९ रुपये काढून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस. एस. खटके अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान पाेलीस वारंवार अनाेळखी व्यक्तीला आपल्या बॅंकेच्या खात्याची माहिती देऊ नका असे सांगत असले तरी नागरिक त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच ऑनलाईन फ्राॅडच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून माेठ्याप्रमाणावर वाढल्या आहेत.